देवरूख : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरू झालेले सर्वेक्षणाचे काम शुक्रवारी माभळे ग्रामस्थांनी बंद पाडले. येथे जमिनीचे अधिग्रहण चुकीच्या पध्दतीने सुरू असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत येथे सर्वेक्षण करू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरतेशेवटी हे सर्वेक्षण बंद केले.संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या २३ पैकी २२ गावांमध्ये हे काम पूर्ण झाले असून माभळे येथे राहिलेले हे सर्वेक्षण करण्यासाठी आज सकाळी मोनार्च या खासगी कंपनीचे कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख, वनविभाग, कृषी विभाग यांचे अधिकारी माभळे येथे दाखल झाले. सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळातच माभळेतील स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी येथे चुकीच्या पध्दतीने जमिन अधिग्रहण होणार असल्याचा मुद्दा लावून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संगमेश्वरच्या हद्दीतून ४५ लिटरचे जमिन अधिग्रहण केले जाणार आहे. संगमेश्वर नावडीतील हा टप्पा विनाहरकत पुर्ण करण्यात आला. मात्र माभळेची स्थिती एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजुला वस्ती आणि डोंगर अशी विचित्र असल्याने येथे एकाच बाजूने ४५ मिटरचे अधिग्रहण करण्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थ नाराज झाले. चौपदरीकरण करताना दोन्ही बाजुने समान जमिन अधिग्रहण करा अशी मागणी माभळेवासियांनी केली मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण करीत असल्याचे सांगीतले. यावरूनही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी सर्वेक्षण बंद करण्याची मागणी केली. ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून आजचे सर्वेक्षण रद्द केले.यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तालुका निरीक्षक भुमिअभिलेख यांना निवेदन सादर करीत हे सर्वेक्षण व अधिग्रहण चुकीचे असल्याचे नमूद केले. यामध्ये माभळेवासियांचा चौपदरीकरणाला विरोध नसून येथे होणारी अधिग्रहणाची प्रक्रिया चुकीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी सुनील घडशी, स्वप्नील शेट्ये, दिनेश घडशी, रावजी घडशी, पंचायत समिती सदस्य हर्षदा डिंगणकर, सुखदा घडशी, दिलीप पेंढारी, हेमंत डिंगणकर, नावडी सरपंच विवेक शेरे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सर्वेक्षणाचे काम पाडले बंद
By admin | Updated: May 23, 2015 00:32 IST