लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील कावळा नाक्यावरील ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरातील सकल मराठा समाजाच्या पमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. १६ जूनला झालेल्या मूक आंदोलनानंतर मुंबईत सरकारशी झालेल्या निर्णयाबंधी चर्चा करण्यासाठी बैठक झाली.
शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन तेवत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी रास्ता रोको करण्यात येईल. यासाठी प्रत्येकांनी कमीत कमी ५० कार्यकर्ते घेऊन यावेत. मराठा आरक्षणाच्या लढ्याचा केंद्रबिंदू शिवाजी पेठच राहील. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यासाठी ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी मागणी शहरातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येईल.
किसन भोसले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवताना त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे.
अनिल घाटगे म्हणाले, राज्य सरकारला एका दिवसात सगळ्या मागण्या सोडवणे शक्य नाही. आता सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
आर. के. पोवार म्हणाले, मुंबईच्या बैठकीत सरकारने सात मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे सकारात्मक आहेत.
बैठकीत निवास साळोखे, बाबा पार्टे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, बाबा इंदूलकर यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेला छेद देणारी व या प्रश्नातील भाजपच्या भूमिकेला बळ देणारीच भूमिका मांडली. सरकारशी खासदार संभाजीराजे यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ठोस काहीही झालेले नाही. त्यामुळे पुन्हा लढल्याशिवाय मराठा समाजाला काहीही मिळणार नाही. घाईने बैठक घेऊन संभाजीराजेंना राज्यकर्त्यांनी फसवले आहे. यामुळे त्यांनी राज्यकर्त्यांऐवजी समाजावर अधिक विश्वास ठेवावा. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन झाले. त्यावेळी ठरवण्यात आलेल्या आचारसंहितेचे पालन झाले नाही. राजेंनी राज्य सरकारशी चर्चा करण्यास गडबड केली. बैठकीत ठोस काही निर्णय होतील, असे वाटत होते. पण तसे झालेले नाही. कोणाच्या तरी हट्टापायी एका रात्रीत बैठक झाली, हे चुकीचे आहे. आम्ही मराठा आरक्षणाचे नेतृत्व संभाजीराजेंकडे साेपवले आहे. पण आम्हाला त्यांच्या मागे ओढत जाणे शक्य नाही, अशा भावना या कार्यकर्त्यांनी मांडल्या. यावेळी जयेश कदम, दिलीप देसाई, रविकिरण इंगवले यांची भाषणे झाली. प्रकाश घाटगे, दुर्गेश लिंग्रज, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.
चौकट
ओबीसीतून आरक्षण द्या
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, मराठा समाजास मूक आंदोलनाने काही मिळणार नाही. म्हणून यापुढे समाजाने मूक आंदोलन करू नये. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळू शकते. पण याकडे राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांची अडचण आहे. म्हणून आम्ही आता ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी केली पाहिजे.