उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील धरणग्रस्त काळम्मावाडी वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नाही. गट नं. ९९७ सह अन्य मिळकतीमध्ये आरसीसी पक्की बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे तत्काळ थांबवावी, अन्यथा शिरोळ गटविकास अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन १९८७ साली दूधगंगा काळम्मावाडी धरण बांधण्यात आले. यावेळी कोनोली (ता.राधानगरी) या गावचे स्थलांतर उदगाव येथे करण्यात आले. यावेळी शासनाने राहण्यासाठी तसेच आरक्षित जागा धरणग्रस्तांना दिली आहे. उर्वरित रिकाम्या भूखंडावर अनेक अतिक्रमण झाले आहेत. याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनदेखील यावर कारवाई केली जात नाही. ९९७ गट नंबरसह अन्य ठिकाणी आरसीसी बांधकामे बांधण्यात येत आहेत. हे तत्काळ थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांनी बांधकाम करीत असलेल्या नागरिकांना बोलावून तत्काळ बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच बेकायदेशीर पुन्हा बांधकाम सुरू केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवेदनावर माजी पं. स. सदस्य बाबूराव पाटील, लक्ष्मण पाटील, नानासो पाटील, उमेश पाटील, बजरंग पाटील, विश्वनाथ चव्हाण, गुरुनाथ म्हाबळे, दिलीप पाटील, विठ्ठल पाटील, प्रसाद पाटील, राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - १२०१२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे ग्रामविकास अधिकारी वळवी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.