लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या राज्यातील पत्रकार व औषध विक्रेत्यांना कोविड योध्दा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देणार असल्याचेही म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सचिव शशिकांत खोत यांनी मंत्री मुश्रीफ यांना या मागण्यांचे निवेदन दिले.
कोरोनाच्या लढाईत डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासोबतच औषध विक्रेत्यांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सबंध महाराष्ट्रात ७० हजारांहून अधिक औषध विक्रेते आहेत. कोरोना महामारीत या सर्वांनी अहोरात्र अविरत सेवा केली आहे. औषधे देत असताना कोरोना बाधितांचे नातेवाईक किंवा संबंधित यांच्यामुळे औषध विक्रेत्यांनाही या संसर्गाची बाधा होत असते. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे हजारो औषध विक्रेते, पत्रकार व त्यांचे कुटुंबीय बाधित झालेले आहेत, तर शेकडो मृत्यू पावल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.