मलकापूर : टेकोली (ता. शाहुवाडी) येथील नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा शाहुवाडी यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरण कार्यालयावर गावातील महिलांनी निदर्शने केली. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी केले.
टेकोली येथील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरण कंपनीने बंद केल्याने ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसह महिलांनी डोक्यावर घागर घेऊन निदर्शने केली. यावेळी महावितरण कार्यालयाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवराज काटकर म्हणाले की, अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे असून, याबाबत महावितरणचे योग्य तो निर्णय घ्यावा व संबंधित गावातील पिण्याच्या पाण्याची सोय करावी. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्याम राज यांना ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच शौकत हवलदार, संजय जाधव, सतीश तांदळे, रोहित जांभळे, संदीप कांबळे, अजय गुरव, प्रवीण कांबळे, सिद्धार्थ लोखंडे आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.