या निवेदनाची प्रत प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनाही देण्यात आलेली आहे. निवेदनावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, कृष्णात खोत, युवराज कोळी यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी चारचाकी खाजगी वाहनांपासून सोळा चाकी अवजड वाहनांपर्यंत सर्वच वाहने कोगनोळी गावातून प्रवास करतात. याच मार्गावर अनेक शाळा, आठवडी बाजार, विद्यार्थी, शेतकऱ्यांची ये-जा सुरू असते. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा या अवैध वाहतुकीमुळे बळी गेला. त्यामुळे ही अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवैध वाहतुकीबाबत नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याचीच दखल घेऊन कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना लेखी निवेदन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.