कोल्हापूर : कोरोना लसीकरण केंद्र सकाळी सातपासून सुरू करावे, लस किती उपलब्ध आहे, याची माहिती केंद्रावर एक दिवस अगोदर फलकावर जाहीर करावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या.
कोरोना संसर्ग रोखण्यात लस महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. लसीकरण केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. केंद्र प्रत्यक्षात कधी साडेनऊ, तर कधी दहा वाजता उघडले जाते. काही वेळात उपलब्ध लस संपल्याचा फलक बाहेर लागतो. अशावेळी रांगेत उभारलेले नागरिक संतप्त होतात. त्यामुळे लसीकरण केंद्रेच सकाळी सात वाजता उघडावीत. जेणेकरून नागरिकांना उन्हात उभे राहावे लागणार नाही. याशिवाय आदल्यादिवशीच लस किती उपलब्ध आहे, याची माहिती केंद्राबाहेरील फलकावर स्पष्ट दिसेल, अशी लावावी. जेवढी लस शिल्लक आहे, त्याप्रमाणात टोकन देऊन त्यांनाच प्राधान्यक्रमाने लस द्यावी. त्यामुळे गर्दी, गोंधळ किंवा वादावादीचे प्रसंग उद्भवणार नाहीत. केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व बैठक व्यवस्था करावी. सर्व लसीकरण केंद्रांवर सुसूत्रता आणावी. अशा सूचना आमदार जाधव यांनी प्रशासक बलकवडे यांना केल्या.