लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अॅण्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क येथे तयार असलेला ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ अद्याप सुरू झाला नाही. याबाबत आपण लक्ष घालून तो तत्काळ सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन इंदिरा ऑटो रिक्षा युनियन, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना व विद्यार्थी वाहतूक संघ यांच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.
निवेदनात, शहरातील रिक्षाचालकांसह लहान टेम्पो व त्या प्रकारातील वाहनधारकांना पासिंगसाठी दिवसभराचा रोजगार बुडवून आर्थिक नुकसान करत कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात जावे लागत आहे. त्यासाठी वेळ व पैसा वाया जातो. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी तारदाळ येथील केएटीपी संस्थेमध्ये जागा उपलब्ध करून दिली. परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून ट्रॅक तयार केला. परंतु तो अद्याप सुरू झाला नाही, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात लियाकत गोलंदाज, राजेश आवटी, जीवन कोळी, रामचंद्र कचरे, मन्सूर सावनूरकर आदींचा समावेश होता.