लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरात वाहनांच्या कोंडीवरून वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडल्याचे चित्र दिसते. वर्दळीच्या मार्गावर बेशिस्तपणे उभी चारचाकी वाहनेच कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. अशा मार्गांवर पोलिसांनी फेरफटका मारून कारवाई करण्याऐवजी सिग्नलजवळ थांबलेले पोलीस मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. भर म्हणून शॉर्टकटसाठी रॉंगसाईटने जाणा-या वाहनधारकांची संख्याही मोठी आहे. असे वाहनधारक वर्दळीच्या रस्त्यावर वेळेची बचत करून चुकीच्या दिशेने जाऊन जीवही धोक्यात घालतात.
शहरात वाहतूक नियंत्रणासाठी ३४ सिग्नल आहे. २६ एकेरी मार्ग असून त्यासाठी सुमारे १६ ते २० पोलिसांची नेमणूक असते. वाहनांच्या कोंडीवर नियंत्रण ठेवताना शाखेकडील अपु-या कर्मचा-यांना कसरत करावी लागते. त्यात पोलिसांची पर्वा न करता वेळ वाचवण्यासाठी रॉंगसाईटचा वापर करणारे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत.
शहरात दीड वर्षातील अपघात : ९३
- मृत्यू : २९
- जखमी : १०१
रॉंगसाईटमुळे अपघात : २४
- मृत्यू : ०७
- जखमी : ११
ही आहे ‘रॉंगसाईट’
अ) पापाची तिकटी ते लुगडी ओळ : पापाची तिकटी, लुगडी ओळ ते बिंदू चौकपर्यंत रस्ता एकेरी वाहतूक आहे. शहरातील वर्दळीचा रस्ता होय.
- अपघातांना निमंत्रण : शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून महाराणा प्रताप चौक मार्गे महापालिकेकडे शॉर्टकटने चुकीच्या मार्गे जाण्यासाठी वर्दळ असते.
- पोलीस असून नसून : महापालिका चौकात सिग्नलजवळ पोलिस असतात, पण त्यांची मार्गावर फिरती कागदोपत्री दिसते.
ब) शिवाजी रोड : बिंदू चौकातून छ. शिवाजी चौक वर्दळीचा एकेरी होय. भर वस्तीत असल्याने मार्गावर वाहतुकीची कोंडी असते.
- अपघाताला निमंत्रण : मार्गावर व्यावसायिकांची दुकाने असल्याने छ. शिवाजी चौकांकडून अथवा आझाद गल्लीतून उलट्या दिशेने वाहतूक होते.
- पोलीस असून नसून : छ. शिवाजी चौकात क्वचितच पोलीस असतात, पण त्यांचे वनवेत प्रवेशणा-या वाहनांकडे दुर्लक्ष असते. अगर त्या मार्गावर फेरफटका मारत नाहीत.
क) बिनखांबी गणेश ते मिजरकर तिकटी : शिवाजी पेठ, मंगळवार पेठेकडून मुख्य महाद्वार रोडकडे जाणारा हा प्रमुख मार्ग होय.
- अपघाताला निमंत्रण : मार्ग एकेरी असला तरीही मिरजकर तिकटी चौकाकडून रॉंगसाईटने शॉर्टकटने वाहने महाद्वार रोडकडे जातात.
- पोलीस असून नसून : मिरजकर तिकटी अथवा गणेश मंदिर मार्गावर क्वचित पोलीस असतात. तरीही वाहनधारक शॉर्टकट म्हणून हा मार्ग वापरतात.
अडीच वर्षांत ८० लाख दंड वसूल
अडीच वर्षांत शहरातून रॉंगसाईटने जाणा-या वाहनधारकांवर ८० लाख रुपये दंडाची कारवाई केली. त्यामध्ये २०१९ मध्ये २३ लाख ५६ हजार, २०२० मध्ये ३४ लाख १९ हजार, २०२१ मेपर्यंत २२ लाख ४ हजार रुपये दंड वसूल केला.
कोट..
वनवे अथवा रॉंगसाईटने जाणारा वाहनधारक आपला व समोरुन येणा-याचाही जीव धोक्यात घालतो. कोणताही धोका न पत्करता नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे. -स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर शहर.
फोटो : २७०६२०२१-कोल-ट्रॅफीक