शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘खगोल’विश्वातील श्रीनिवास कुलकर्णी

By admin | Updated: May 21, 2017 01:01 IST

श्रीनिवास कुलकर्णींच्या अवकाश संशोधनक्षेत्रातील योगदानामुळे जगभरातील अनेक सन्मान त्यांना मिळत गेले. त्यात आता डॅन डेव्हिड पुरस्काराची भर पडली आहे.

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ प्रा. श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांना त्यांच्या खगोलशास्त्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झाला आहे. १० लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार आज, रविवारी त्यांना इस्रायलमधील तेल अव्हिव येथे प्रदान करण्यात येणार आहे. मुळचे कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथील असलेल्या प्रा. कुलकर्णी यांच्या कार्याविषयी ‘लोकमत’ने २०१५ मध्ये ‘ग्लोबल कोल्हापुरी’ या विशेषांकात प्रसिद्ध केला होता. त्यातील काही अंश...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या प्रा. कुलकर्णी यांच्या नावावर खगोल विज्ञानातील अनेक मूलभूत स्वरूपाचे शोध नोंदले गेलेले आहेत. मिल्की वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूलद्रव्यांचे स्वरूप काय, याचा शोध घेण्याबरोबरच प्रा. कुलकर्णींनी ‘पल्सार’ म्हणजेच स्पंदन पावणाऱ्या ताऱ्यांचा, ब्राऊन ड्वार्फस्चा, अवकाशातील गॅमा किरणांच्या विस्फोटांचा विशेष अभ्यास व संशोधन केलेले आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक क्षमतेच्या टेलिस्कोपकडून गोळा केल्या जाणाऱ्या अवकाशातील सिग्नल्सचा शोध घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यासाठीची उपकरणे विकसित करण्यासाठीसुद्धा प्रा. कुलकर्णी ख्यातनाम आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या एकमताच्या शिफारसीमुळे लंडनमधील रॉयल सोसायटीने त्यांना २००१ मध्ये मानाची फेलोशिप प्रदान केली आहे. प्रा. कुलकर्णी यांच्या या कर्तृत्वाबद्दल चालू पिढीतील कोल्हापूरवासीय मात्र काहीसे अनभिज्ञ आहेत. नाही म्हणायला रॉयल सोसायटीची फेलोशिप जाहीर झाल्यानंतर प्रा. कुलकर्णी भारतात आले तेव्हा कुरुंदवाडमध्ये म्हणजे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचा एक छोटेखानी सत्कार झालेला होता, पण तो तेवढाच. कुलकर्णी आजही कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि प्लॅनेटरी सायन्सचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधनाचे काम सुरूच आहे. जगभरातील अनेक संशोधन संस्थांशी आणि विद्यापीठांशी त्यांची नाळ कायमची जुळलेली आहे. नासाच्या एक्झोप्लॅनेट सायन्स सेंटरचे तसेच ‘कॅल्टेक’ आॅप्टिकल आॅब्झर्व्हेटरीजचे संचालकपदही त्यांनी भूषविलेले आहे. १९५० च्या दशकात कुरुंदवाडमध्ये डॉ. रामचंद्र कुलकर्णी नावाचे स्त्रीरोग तज्ज्ञ काम करीत होते. तीन मुलींच्या पाठोपाठ १९५६ साली त्यांना जो मुलगा झाला तो म्हणजे श्रीनिवास. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती यांचेही लहानपण काही काळ कुरुंदवाडमध्ये गेले. श्रीनिवास हे त्यांचे सख्खे भाऊ! श्रीनिवास यांचा जन्म कुरुंदवाडमध्ये झाला असला तरी त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मात्र कर्नाटकातील हुबळी येथे झाले. पदार्थ विज्ञान हा विषय घेऊन दिल्लीतील आयआयटीमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर खगोल विज्ञानात डॉक्टरेट करण्यासाठी श्रीनिवास यांनी अमेरिका गाठली ती कायमचीच. १९८३ मध्ये बर्कले येथून कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या फाईन अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटमधून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली होती. दिल्लीमध्ये आयआयटीत असताना त्यांनी जो संशोधन प्रकल्प प्रयोगासाठी निवडला होता त्याचाच फायदा त्यांना बर्कलेत डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळताना झाला. खरं तर अमेरिकेत त्यांनी आपल्या पल्सार, ब्राऊन ड्वार्फस्च्या विश्वातील कुलकर्णी अभ्यासक्रमासाठी परिश्रम घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खगोल विज्ञानाची फारशी पार्श्वभूमी नव्हती, पण जे समजणार नाही ते कितीही प्राथमिक स्वरूपाचे असले तरी त्याबाबत विचारणा करून समजावून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. अल्पावधीतच त्यांची आकलन क्षमता आणि तीव्र बुद्धिमत्ता याची जाणीव त्यांच्या मार्गदर्शकांना व सहकाऱ्यांना झाली. त्यांनी सर्वप्रथम ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतील हायड्रोजन वायूचे स्वरूप आणि विभागणी यावर काम सुरू केले. यासाठी पोर्टो रिको येथे असलेल्या एका मोठ्या रेडिओ टेलिस्कोपमधून केल्या जाणाऱ्या निरीक्षणांचा उपयोग कुलकर्णी यांना करून घ्यावा लागला. अशाच अभ्यासासाठी पोर्टो रिकोला कुलकर्णी एकदा गेले असताना त्यांना अवकाशातून येणाऱ्या रेडिओ सिग्नल्सपैकी विशिष्ट रेडिओ सिग्नल्सचा मूळ स्रोत कोठे आणि कसा असू शकेल याबाबत विचारणा करण्यात आली. कुलकर्णी यांनी मन:पूर्वक हा शोध घेतला आणि हा मूळ स्रोत म्हणजे एक स्पंदन पावणारा तारा (पल्सार) असल्याचे स्पष्ट झाले. कुलकर्णी यांच्या नावावर १९८२ मध्ये या पल्सारचा शोध नोंदला गेला. त्यानंतर त्यांनी पल्सारच्या चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास केला. पल्सारची निर्मिती खगोलीय प्रणालींमध्ये कशा पद्धतीने होत जाते याविषयी खूपशी नवी माहिती जगासमोर आणली. यानंतर कुलकर्णींच्या नावावर शोध जमा झाला तो ब्राऊन ड्वार्फस् म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवकाशातील एका वेगळ्या गोष्टीचा. अवकाशातील ब्राऊन ड्वार्फस्चे वस्तुमान तो तारा बनण्यासाठी पुरेसे नसते आणि ग्रह म्हणून त्याची घडण व्हायची तर त्यासाठी ते वस्तुमान खूपच जास्त असते. तारे काय किंंवा ब्राऊन ड्वार्फस् काय यांची घडण ही इंटर स्टेलर क्लाऊडस्च्या टकरावातून होत असते. यानंतर जीआरबी ९७०२२८ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅमा रे विस्फोटाबाबतचा शोध कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९७ मध्ये घेतला. श्रीनिवास कुलकर्णींच्या अवकाश संशोधनक्षेत्रातील योगदानामुळे जगभरातील अनेक सन्मान त्यांना मिळत गेले. त्यात आता डॅन डेव्हिड पुरस्काराची भर पडली आहे.- उदय कुलकर्णी, कोल्हापूर