शिरोळ : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. साठ टक्के आरटीपीसीआर तर, चाळीस टक्के अॅन्टिजेन तपासणीची मोहीम शिरोळ, जयसिंगपूर शहरात नगरपालिकेकडून राबविली जात आहे. त्यामुळे ऑन दि स्पॉट कोरोना चाचणीमुळे प्रशासनाला मदत होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पहिल्या टप्प्यात नगरपालिकेने आरोग्य विभागाच्या मदतीने व्यापारी, फळ, भाजीविक्रेते व संशयित व्यक्तींची अॅन्टिजन तपासणी मोहीम राबविली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शिरोळ तालुक्यात आरटीपीसीआर व अॅन्टिजन तपासणीचे टार्गेट देण्यात आले आहे.
त्याप्रमाणे ग्रामीण व शहरी भागात तपासणीची मोहीम सुरू आहे. व्यापारी, विक्रेते, सहकारी संस्था, उद्योग, विटभट्टी, कारखाना याठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. बँका, महावितरण, तहसील कार्यालय येथे कर्मचाऱ्यांची तपासणीदेखील केली जाणार आहे. शिवाय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणखी सतर्क झाले आहे. अॅन्टिजन तपासणीमुळे ऑन दि स्पॉट कोरोनाची चाचणी केली जात आहे. जयसिंगपूर व शिरोळमध्ये ही मोहीम व्यापकपणे राबविली जात आहे. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही नागरिकांनी बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये, संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. शासनाच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो - ३००६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथे बुधवारी बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांची ऑन दि स्पॉट अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)