लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासूनच शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान तैनात आहेत. वाहनांची तपासणी व विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
रविवारी दवाखाने व औषध दुकाने वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. बँका, भाजीपाला, किराणा दुकाने व दूधविक्री या अत्यावश्यक सेवाही बंद आहेत.
शहरातील शिवाजी चौकात दूधसंस्था आहेत. त्याठिकाणी केवळ दूध संकलनास परवानगी देण्यात आली. दूध विक्री बंद ठेवून सकाळी दूध आणण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले. घरपोच सेवा देऊन दूधविक्री करणाऱ्या शेतकरी व व्यावसायिकांना परवानगी दिली आहे.
सकाळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घरी राहण्यास सांगितले. वाहन घेऊन विनाकारण बाहेर आलेल्या नागरिकांची वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांनीही घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कमी ताण आला.
फोटो ओळी :
गडहिंग्लज येथे कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात अशा प्रकारे पोलिसांची फौज तैनात होती.
क्रमांक : १६०५२०२१-गड-०९