लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व वैभवाचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे रविवारी घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली,’ असे म्हणत गौराईला वाजत-गाजत उत्साहात घरी आणून स्थापना केली. त्यानंतर, पूजा-अर्चा करून भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
लाडक्या बाप्पांचे शुक्रवारी (दि.१०) सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. त्यानुसार, महिलांनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. रविवारी सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी महिला आतूर झाल्या होत्या. गौरींचे आगमन म्हणजे महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस. या गौरींना बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ, हार अशा विविध प्रकारच्या आभूषणांनी सजविले होते. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पूजनाचा व पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असे एकूण तीन दिवस त्यांचे वास्तव्य घराघरात असते. या तिन्ही दिवशी गौराईची मनोभावे सेवा केली जाते. गौरीच्या आगमनामुळे घरात झिम्मा-फुगडीचे खेळ रात्रभर सुरू असतात. कोरोना महामारीमुळे शासनाच्या नियमावलीचे पालन करत, काही महिलांनी घराजवळच गौरींचे पूजन करून घरात स्थापना केली, तर काही ठिकाणी वाजत गाजत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
फोटो ओळी
१२०९२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत महिलांनी वाजत-गाजत गौरींचे घरोघरी उत्साहात आगमन केले.
१२०९२०२१-आयसीएच-०४
काही महिलांनी झिम्मा-फुगडीचा खेळ खेळला.