कोल्हापूर : गर्भलिंग निदान कायद्याचे स्वरूप स्पष्ट व्हावे, त्याच्या अंमलबजावणीसाठी सक्षम व पूर्ण ज्ञान असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अधिकार असावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेने देशातील स्त्रीरोग हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन बुधवारी (दि. १५) ‘बंद’ची हाक दिली आहे; परंतु या दिवशी जिल्ह्यातील एकही सोनोग्राफी मशीन बंद राहणार नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब आरसूळकर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सध्या या कायद्याखाली जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते प्रत्यक्षात लिंगचाचणीपेक्षा फॉर्म व्यवस्थित भरला नाही, डॉक्टरांची सही मूळ सहीशी जुुळत नाही. सूचनाफलक नाही, फॉर्ममध्ये खाडाखोड आहे, अशा किरकोळ कारणांवरूनच डॉक्टरांवर अधिक गुन्हे दाखल आहेत. तपासणी करणाऱ्यांनाच नेमके काही माहीत नसल्याने काहीतरी कारवाई केली, हे दाखविण्यासाठी ते सोनोग्राफी मशीन सील करतात, असा संघटनेचा आरोप आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरसूळकर म्हणाले, आपल्यापर्यंत या संदर्भात कोणतीच लेखी माहिती आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी मशीन बुधवारी सुरूच राहतील. गर्भलिंग निदान चाचणीवर अंकुश ठेवण्यासाठी सोनोग्राफी मशीनवर बसविलेल्या ‘सायलेंट आॅब्झर्व्हर’मुळे अशा चाचण्यांना चाप बसला आहे. यातील काही मशीन बंद आहेत; परंतु जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे तीही पूर्ववत सुुरू होतील.
सोनोग्राफी मशीन बुधवारी बंद राहणार नाहीत
By admin | Updated: April 12, 2015 00:42 IST