कोल्हापूर : पहिल्या फेरीत कऱ्हाडमधून परत पाठवून दिलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा मंगळवार, दि. २८ सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोमय्या यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही लेखी पत्र पाठवून दौऱ्याची आगावू अधिकृत कल्पना दिली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील शुक्रवारी कागलमध्ये दाखल होत आहेत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी १२७ कोटींच्या घोटाळ्याचा १३ सप्टेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात आगडोंब उसळला. अखेर सोमय्या कऱ्हाडमध्ये उतरले आणि मुश्रीफांवर दुसरा आरोप करून मुंबईला परत गेले. आता त्यांनी आपण मंगळवारी २८ सप्टेंबरला कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही पत्र लिहिले आहे. दौऱ्याचा कार्यक्रम लिहून योग्य व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे.
कोट
सोमय्या यांच्या दौऱ्याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनास मिळाले आहे. त्याबाबतचे नियोजन दोन दिवसांत केले जाईल.
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
.....................
मुरगूड शहरात किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदी
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा निषेध करून त्यांना मुरगूड शहरात कायमची प्रवेशबंदी करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.