सावंतवाडी : सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांची यवतमाळ येथे वनकार्य योजना विभागात बदली केली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील समाधान चव्हाण यांची नियुक्ती केली असून, तसे आदेश गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथील वनविभागाच्या मुख्यकार्यालयाला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, शासनाने तीन वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील बहुतांशी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, चव्हाण हे लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग वनविभागाचे उपवनसंरक्षक म्हणून एस. रमेशकुमार यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यांच्याच काळात हत्ती हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सतत हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून माणगाव खोऱ्यात हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली. त्याला चांगले यशही मिळाले होते. या मोहिमेचे संपूर्ण राज्यभरात स्वागत करण्यात आले. मात्र, हत्ती मोहीम यशस्वी झाल्यानंतर पकडण्यात आलेल्या तीन जंगली हत्तींपैकी दोन हत्तींचा मृत्यू झाल्याने या मोहिमेवरच ठपका ठेवण्यात आला होता. नंतर तज्ज्ञ समितीने यामागची कारणे शोधून काढली. यात जंगलातील हत्तींचे राहणीमान व मनुष्यवस्तीतील राहणीमान यात मोठा फरक असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच या हत्तींना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून यातील एका हत्तीला प्रशिक्षणासाठी कर्नाटक, शिमोगा येथे पाठविले आहे. तेथे हत्तीला प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी पुन्हा जिल्ह्यात आणण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
उपवनसंरक्षकपदी समाधान चव्हाण
By admin | Updated: April 8, 2017 00:29 IST