कोल्हापूर : माजी विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या विनोदकुमार चव्हाण (रा. गोगवे, ता. शाहूवाडी, मूळ गाव बसवनगर, सोलापूर) याला बुधवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी याबाबतचे आदेश काढले. निलंबन काळात त्याला चंदगड पंचायत समितीमध्ये उपस्थिती बंधनकारक केली आहे.
पाटणे येथील प्राथमिक शाळेत चव्हाण कार्यरत होता. २५ मे २०२१ रोजी माजी विद्यार्थिनी आईवडिलांसमवेत शाळेत लसीकरणाच्या निमित्ताने आली होती. या वेळी तिच्याशी चव्हाण याने अश्लील वर्तन केले. मात्र, याबाबत पालकच तक्रार देत नसल्याने कारवाई करण्याबाबत कोंडी झाली होती. त्यामुळे बालकल्याण समितीने कोणी तक्रारदार नसतील तर तुम्हीच गुन्हा दाखल करा, अशा शाहूवाडी पोलिसांना सूचना केल्या होत्या. शाहूवाडीचे सभापती विजय खोत आणि जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनीही संबंधितावर कारवाईची मागणी केली होती. प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत चौकशी केली होती. परंतु कोणती तक्रारच नसल्याने त्यांच्या अहवालात अश्लील वर्तन सोडून अन्य तक्रारींचा उल्लेख होता. अखेर वडिलांनी तक्रार दिल्यानंतर ८ जूनला चव्हाण याला अटक करण्यात आली. हा अहवाल जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले.