ग्रामस्थांनी मृतदेह दोन तास रोखला
वरद पाटील याचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरल्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे अडीच ते तीन हजार लोक जमले होते. पोलीस बंदोबस्तात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमलेले नागरिक कमालीचे संतप्त झाले. त्यांनी तब्बल दोन तास मृतदेह रोखून धरला.
संशयित आरोपीला ताब्यात द्या
ही एकच मागणी लावून धरली होती. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर बारा दिवसांच्या आत त्याला फाशी द्या, या एकाच मागणीवर ठाम राहिले. शेवटी तपास वेगाने आणि निःपक्षपातीपणे करण्याचे आश्वासन डीवायएसपी आर. आर. पाटील व सपोनि विकास बडवे यांनी दिल्यानंतर दीडच्यासुमारास मृतदेह बंदोबस्तात कोल्हापूरला नेला.
गावात सीसी टीव्ही बसवा
सावर्डे बुद्रुक हे तसे परिसरातील मोठे गाव. वरद याच गावातून गायब झाल्यापासून पोलिसांनी प्रचंड वेगाने तपास केला. संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते; पण पुरावे मिळत नव्हते. गावात कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळते का, हे ही पाहिले; पण कुठेच ही सोय नव्हती. त्यामुळे तपासात थोडा अडथळा आला. त्यामुळे गावात आता सीसी टीव्ही कॅमेरे बसवा, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच आदींना केली.
ग्रामस्थांवर सौम्य लाठीमार
आरोपीला घटनास्थळावर हजर केल्याशिवाय मृतदेह नेऊ न देण्याच्या पवित्र्यात ग्रामस्थ होते. यामध्ये महिलांचा सहभागही मोठा होता. यातील काही ग्रामस्थ फारच आक्रमक झाले होते.
अधिकाऱ्यांना घेराव घालून मोठ मोठ्याने वाद घालत होते. त्यातच ढकलाढकली झाल्याने थोडा गोंधळ उडाला. यावेळी जमाव दूर करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
माणुसकीला काळिमा
संशयित आरोपी मारुती वैद्य हा वरदच्या वडिलांचा मित्र होता. त्यामुळे वारंवार त्याचे येणे-जाणे होते. सावर्डे बुद्रुक येथील वरदच्या आजोबांच्या वास्तुशांती कार्यक्रमाला मारुती आला होता. संध्याकाळी साडेसातच्यासुमारास दुकानातून खाऊ आणण्यासाठी गाव तलावाच्या दुकानाजवळ नेले. तिथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याला ठार मारून त्याचा मृतदेह लपवून ठेवला आणि काय घडलेच नाही, या अविर्भावात तो परत वास्तुशांती समारंभात आला आणि बिनधास्तपणे जेवला. त्यामुळे या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याचा अनेकजण निषेध करत होते.
सोशल मीडियावर फाशीची जोरदार मागणी
वरदचा खून त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केल्याचे समाजमाध्यमावरून समजल्यानंतर दिवसभर या घटनेवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पडत होत्या. मैत्री आणि माणुसकीचा अंत...काय मिळालं चिमुकल्या जीवाला मारून, महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील माणुसकीला काळिमा फासणारी घटना जाहीर निषेध, साधूबाबा भोंदूबाबा यांचा पराक्रम मग बघा आणि आतातरी जागे व्हा, अंधश्रद्धा मोडून काढा, असे मेसेज फिरत होते, तर आरोपीला फाशीच झाली पाहिजे, अशीही मागणी जोरदार झाली.
...........
२० सोनाळी १,२
फोटो ओळ : वरदचा मृतदेह सापडला असल्याची कुणकुण सावर्डे बुद्रुक आणि सोनाळी या गावातील महिलांना लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला घटनास्थळी जात होत्या; पण पोलिसांनी ग्रामपंचायत चौकात त्यांना अडवल्यानंतर महिलांनी तिथे ठिय्या मांडून आक्रोश केला.
सोनाळी (ता. कागल) येथील संशयित मारुती वैद्य याच्या घराच्या अवतीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.