राम मगदूम -गडहिंग्लज - एखाद्या सामाजिक कामात सहभागी होण्याची अनेकांची तीव्र इच्छा असते; पण नेमके काय करायचे, कोणाला मदत करायची, कुणासोबत काम करायचे, आपल्या खिशाला खर्च पेलवेल काय? असे अनेक प्रश्न पडतात. त्यावर गडहिंग्लजमधील चौघांनी उत्तर शोधले आहे. कोल्हापुरातील ‘प्रतिज्ञा’ या संस्थेच्या प्रेरणेतून ‘स्नेहालय’ या नावाने ही मंडळी एकत्र आली आहेत. एकट्याने मदत करणे शक्य नाही. अनेकजण एकत्र आल्यास मोठी मदत करता येते. त्यासाठी दर महिन्याला प्रत्येकी १०० रुपये इतकी वर्गणी काढायची आणि जमलेली रक्कम गरजू रुग्णांच्या उपचारासाठी, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी, आपद्ग्रस्त, अपघातग्रस्त, अपंगांच्या उपचारासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे. देशाच्या राष्ट्रीय प्रतिज्ञेतील ‘त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे’ या शेवटच्या ओळी डोळ्यांसमोर ठेवूनच या संस्थेची वाटचाल राहणार आहे. समाजातील वंचित-उपेक्षितांना जगण्यासाठी मानसिक पाठबळ आणि स्नेहपूर्वक मदतीचा हात देण्याचा त्यांचा संकल्प आहे.‘स्नेहालय’च्या कामासाठी उदय तौकरी, प्रदीप साबळे, संगम आजरी व संजय कुलकर्णी हे उत्स्फूर्तपणे पुढे आले आहेत. मात्र, या संस्थेचा कुणी अध्यक्ष असणार नाही, कुणी सचिव वा खजिनदार नाही. सर्वजण अध्यक्ष अन् सर्वजण शिपाई अशीच सर्वांची भावना आहे. महिन्यातून एक दिवस-एक तास या कामासाठी सर्वमंडळी एकत्र जमणार आहेत. दर महिन्याच्या बैठकीचे निरोप देण्यासाठी फोन आणि ‘एसएमएस’चा खर्चदेखील ते स्वत: करणार आहेत. बैठकीच्यावेळी चहा-पानाचा खर्चदेखील ते स्वत:च्या खिशातूनच करणार आहेत. ठरल्याप्रमाणे १०० रुपयांची मासिक वर्गणी या बैठकीत जमा केली जाईल. त्यानंतर जमलेली रक्कम त्वरित गरजूंपर्यंत पोहोचवली जाणार आहे.‘आज राम मंदिरात बैठकस्नेहालय’च्या प्रमुख कार्यकर्त्यांची पहिली बैठक उद्या, सोमवारी दुपारी ४.३० वाजता येथील भडगाव रोडवरील राम मंदिरात होणार आहे. मासिक वर्गणीतून गरजूंसाठी मदत संकलनाच्या कामाचा प्रारंभ या बैठकीतच होणार आहे.
१०० रुपयांत समाजसेवा
By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST