कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीचा नारा आज, रविवारी कोल्हापूरचे सुपुत्र व पक्षकार प्रसाद जाधव यांनी मुंबई येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये दिला. त्यांनी ४२ किलोमीटर अंतर पार केले. मॅरेथॉनमध्ये धावताना जाधव यांनी ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा दिला. मुंबई येथे आज छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली.गेल्या २५-३० वर्षांपासून या प्रश्नासाठी कोल्हापूरसह रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांतून लढा सुरू आहे. या जिल्ह्यांतील वकीलबांधव, नागरिक तसेच विविध संघटना या प्रश्नासाठी सातत्याने आग्रही आहेत. गतवर्षी झालेल्या मॅरेथॉनमध्ये ‘जर्नी फॉर जस्टिस’चा नारा प्रसाद जाधव यांनी दिला होता. त्यावेळीही त्यांनी खंडपीठाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक नसल्याचे दिसते.दरम्यान, आज या मॅरेथॉनचा प्रवास बांद्रा सी लिंक, वरळी व पुन्हा सीएसटी असा सुमारे ४२ किलोमीटरचा असा झाला. दुपारी त्यांनी हे अंतर पूर्ण केले. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, असा संदेश देणारा टी-शर्ट घालून आणि सोबत मागणीचा फलक घेऊन त्यांनी प्रवास पूर्ण केला. त्याच्याबरोबर कोल्हापुरातून गेलेले वकील काही अंतर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अॅड. कुलदीप कोरगावकर, अॅड. तेजगोंडा पाटील, अॅड. समीउल्ला पाटील, अॅड. योगेश तेली यांचा समावेश होता. ( प्रतिनिधी )कोल्हापूरचे सुपुत्र व पक्षकार प्रसाद जाधव यांनी रविवारी मुंबईत झालेल्या मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खंडपीठ प्रश्नासाठी सहभाग नोंदवून ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा दिला.
मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा
By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST