कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चप्पलफेक करण्यात आली. तब्बल पाच तास चाललेल्या सभेत ताळेबंदावरून सत्तारूढ व विरोधक यांच्यामध्ये अनेक वेळा झोंबाझोंबी झाली. कोअर बॅँकिंग प्रणाली, हातकणंगले येथील जागाविक्री यांसह विविध प्रश्नांवरून विरोधकांनी संचालकांना धारेवर धरले. प्रश्न विचारण्यास सुरुवात झाल्यानंतर एकमेकांकडून रोखले जात असल्याने गोंधळ उडत होता. अखेर गोंधळ वाढत गेल्याने गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे होते.मागील सभेचे प्रोसीडिंग वाचन सुरू असताना माजी संचालक बाळासाहेब पोवार यांनी रोखले. यावर, इतरांनी प्रश्न विचारला असता तर बरे वाटले असते, असा टोला अध्यक्ष वरुटे यांनी लगावल्यानंतर येथूनच गोंधळास सुरुवात झाली. गंगाजळीमधील रक्कम लाभांश समीकरण निधी म्हणून घेतल्याचे जोतीराम पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. या दरम्यानच एका सभासदाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याला रोखल्याने झोंबाझोंबी सुरू असतानाच एकाने ‘डायस’च्या दिशेने चप्पल फेकल्याने एकच गोंधळ उडाला. हातकणंगले येथील जागाविक्री संशयास्पद असल्याचे सांगत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी अर्जुन पाटील व शंकर मनवाडकर यांनी केली. सभेपुढे विषय ठेवून विक्री केल्याचे वरुटे यांनी सांगितले. गडहिंग्लज शाखेत सभासद करून घेत नसल्याचे जोतीराम पाटील यांनी सांगितले. यावर, असे होत नाही. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांनाच सभासद करून घेतल्याचे वरुटे यांनी सांगितले. हा विषय ताणून धरत हातकणंगलेची जागाविक्री रद्द करण्याची मागणी लावून धरीत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. विरोधकांना शांत करीत सभेला गालबोट लावू नका, अशी विनंती वरुटे करीत होते. मात्र, विरोधक ऐकत नसल्याने सत्तारूढ गटाने सर्व विषय मंजूर करीत सभा संपविली. सभासद नसलेले सभेत!बॅँकेचे सभासद नसलेल्या व्यक्ती सभेत दिसत असल्याने सुरुवातीलाच त्यावर समितीच्या सभासदांनी आक्षेप घेतला. आम्हाला भीती दाखविण्यासाठी अशा लोकांना आणले का? असा थेट आरोप करीत ए. के. पाटील, प्रसाद पाटील यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधितांना बाहेर घालविण्यात आले.
शिक्षक बँकेच्या सभेत चप्पलफेक
By admin | Updated: August 11, 2014 00:20 IST