कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आक्रमक झाले आहेत. त्यांनी संघटितपणे शुक्रवारी (दि. २७) उद्योग बंद ठेवून ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्याचा निर्णय उद्योजकांच्या संयुक्त बैठकीत रविवारी घेतला आहे.येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात बैठक झाली. वीज दरवाढीमुळे उद्योग मेटाकुटीला आले आहेत. वीजदर कमी व्हावेत यासाठी उद्योजकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदारांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली, चर्चा केली. त्यावर संबंधितांनी बैठक घेऊन वीजदर कमी करू, अशी आश्वासने दिली. गेल्या दोन महिन्यांपासून बैठकीत दिलेली आश्वासने शासन पाळेल याची औद्योगिक संघटनांनी प्रतीक्षा केली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्या पार्श्वभूमीवर ३ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या राज्यव्यापी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीने वीज दरवाढीविरोधात आंदोलनाचा कार्यक्रम ठरविला आहे. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात शुक्रवारी शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल आदी परिसरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय सकाळी साडेनऊ वाजता सासने मैदान येथे एकत्रित येऊन ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यासह वीज बिलांची होळी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.बैठकीस कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे रवींद्र तेंडुलकर, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित आजरी, कागल-पंचतारांकित असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे, विलास जाधव, नयन प्रसादे, राजू पाटील, संजय उरमनट्टी, संजय जोशी, अतुल पाटील, रामराजे बदाले, चंद्रकांत जाधव, देवेंद्र दिवाण, गोरख माळी, प्रदीप व्हरांबळे, टी. एस. घाटगे, शंतनू गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीज दरवाढीविरोधात शुक्रवारी ‘उद्योग बंद’
By admin | Updated: February 23, 2015 00:29 IST