कोल्हापूर : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवलेली ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना जिल्ह्यात राबवावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
फॅमिली डॉक्टरांनी माझा डॉक्टर बनून होम आयसोलेट असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केल्यास कोरोना संसर्ग सुरुवातीलाच रोखणे शक्य आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही संकल्पना राबवावी, असे निवेदनात म्हटले आहे.
--
लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे
कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त जमा झालेल्या लोकवर्गणीतून दौलतनगर येथील विशाल कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्यावतीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रभागात सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच असे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
--
बेघरांसाठी मदतीचे आवाहन
कोल्हापूर : एकटी संस्थेतर्फे १३२ बेघरांना कोविडच्या महामारीत निवारा देण्यात आला आहे. त्यांना मूलभूत सोयी-सुविधा व औषधोपचार पुरवण्यात संस्थेला अडचणी येत असून, नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.
संस्थेत दाखल होणाऱ्यांचे स्वॅब तपासून त्यांना कपडे, जेवण, रोगप्रतिकारक औषधे, कोरोना लस पुरवली जाते. सध्या ही संख्या वाढल्याने अन्न व औषधोपचार पुरवण्यात अडचणी येत आहेत. तरी नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-