गांधीनगर बाजारपेठ ही होलसेल व रिटेल यासाठी प्रसिद्ध असल्याने सर्व वस्तू माफक दरात मिळतात. त्यामुळे कर्नाटक, सांगली सातारा व कोकण या परजिल्ह्यातून इतर व्यापारी व ग्राहक खरेदीसाठी गांधीनगरला पसंती देतात. गणेशाचे आगमन अवघ्या काही तासांवर आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, गतवर्षी प्रमाणेच यंदाही प्रशासनाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नियम पाळून उत्सव साजरा करण्याची तयारी घरोघरी आणि मंडळाकडून सुरु आहे. प्लास्टिक फुलांच्या माळा, रंगीबिरंगी फुले, विविध प्रकारच्या लायटिंग माळा, पूजेचे साहित्य, सिंहासने, हार, तुरे, विविध प्रकारची फर्निचर, या साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा लोंढा गांधीनगर बाजारपेठेत येत आहे. पावसाची संतत धार सुरु असतानाही ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत होते. दिवसभर सुरु असणाऱ्या पावसाच्या रिपरिपीमुळे फिरस्त्या व्यवसायिकांची मात्र तारांबळ उडाली. पूजेच्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाप्पांच्या नैवेद्यसाठी विविध प्रकारच्या मिठाईच्या मोदकास ग्राहकांतून मागणी आहे.
फोटो : ०८ गांधीनगर बाजारपेठ
गांधीनगर येथील बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.