इचलकरंजी : येथील आजी-माजी नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान शिवीगाळ, अंगावर धावून जाणे अशी सोमवारी झालेली घटना ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी व ठेकेदारीतून घडल्याने पालिकेच्या कारभाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. याशिवाय नगरपालिकेच्या बाहेरील काही कारभाऱ्यांचा कामकाजात होणारा हस्तक्षेपही अधोरेखित झाला आहे.२०११ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविताना त्यावेळी राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे यापूर्वी कधीही झाल्या नाहीत, अशा ईर्ष्येने या निवडणुका लढविल्या गेल्या. निवडणुकीच्या प्रचारात मान्यवर पक्षांचे स्थानिक, जिल्हा व राज्यस्तरीय नेतेही कोपरा सभा व पदयात्रा घेत होते. ईर्ष्येबरोबरीनेच निवडणुकीसाठी लाखोंची उधळण करण्याची स्पर्धाही उमेदवारांत होती.निवडणुकीतील मतमोजणीच्या निकालात कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १० व ‘शविआ’चे १७ नगरसेवक निवडून आले. सत्तेत येताना दोन्ही कॉँग्रेसची आघाडी झाली. निवडणुकीत झालेली उधळण पुन्हा जमविण्यासाठी काही नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावात विविध विकासकामांचे व नागरी सेवा-सुविधांचे ठेके घेतले आणि यातूनच ठेकेदारीची स्पर्धा झाली आणि कामांचाही दर्जा घसरला, अशी पालिकेत चर्चा आहे.सोमवारी नगरसेवक मोहन कुंभार त्यांच्या प्रभागातील स्वच्छता गेले काही दिवस होत नसल्याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यानंतर कुंभार यांनी डॉ. संगेवार यांना अपशब्द वापरल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या दालनात निदर्शने केली. तेथे आलेले नगरसेवक कुंभार व डॉ. संगेवार यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. याचवेळी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी या प्रकरणात घुसखोरी केली. कुंभार व चाळके यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि चाळके यांनी कुंभार यांना बूट दाखविला. त्यामुळे नगरपालिकेमध्ये जोरदार गदारोळ उडाला.या घटनेनंतर कुंभार यांचे बिंग फोडताना, त्या प्रभागातील साफसफाईचा ठेका त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याला मिळवून दिला होता. तो नंतर रवी लोहार यांच्या कार्यकर्त्याला विकला. तेव्हा कुंभार यांना दोन लाख रुपये देण्यात आले होते आणि पुन्हा कुंभार पाच लाख रुपये मागत असल्याचा आरोप रवी लोहार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आणि मोबाईलवर संग्रहित केलेले संबंधित संभाषण ऐकविले, तर नगरपालिकेशी चाळके यांचा काय संबंध, असा प्रश्न कुंभार यांनी या वादावेळी उपस्थित केला होता. अशा प्रकारच्या घटना काल घडून गेल्याने पालिकेचा कारभार हाकणाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाचे अंजन डोळ्यात घालून संबंधितांनी आपल्या कारभारात योग्य ती दुरुस्ती करावी, अशी चर्चा पालिकेतील कर्मचारी व नागरिकांमध्ये आज दिवसभर होती. (प्रतिनिधी)
नगरसेवकांची ठेकेदारीतून दुकानदारी
By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST