अतुल आंबी - इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली कोट्यवधींची उलाढाल पाहता अनेक विद्यमान, माजी आणि इच्छुक नगरसेवकांना धडकी भरली आहे. कारण विधानसभेला हा दर, तर नगरपालिकेला किती, असा प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमू लागला आहे. याबाबतची खंत व्यक्त करताना ते लोकप्रतिनिधी विकासकामे करायची, की फक्त लक्ष्मीदर्शनच हे समजेना, अशी तिखट प्रतिक्रियाही व्यक्त करताना दिसत आहेत.लोकसभेवेळी आलेल्या मोदी लाटेत राज्यासह जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते पडले. त्यानंतर विधानसभेची मोर्चेबांधणी जोरदारपणे सुरू झाली. अशातच भाजप-सेनेची महायुती व कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली आणि एकूणच निवडणुकीची समीकरणे बदलली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. राज्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे, असे म्हणत सर्व प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या पाठीशी ‘मोठी’ ताकद लावली. परिणामी या निवडणुकीत करोडोंची उलाढाल झाली.ही यंत्रणा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच काही मध्यमवर्गीय भागातही पोहोचविण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर पक्षाच्या नगरसेवकांवरही जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी पार पाडत असताना नगरसेवकांचे मात्र धाबे दणाणले होते. कारण हा विधानसभेचा आकडा नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत वाढून त्यासाठी हट्टही धरला जाणार, हे ध्यानात आले होते. काही नगरसेवकांची मुले व प्रमुख कार्यकर्ते नगरसेवकांना ‘हे आपल्याला पेलवणारे नाही. त्यामुळे राजकारणाला रामराम केलेलाच बरा’, अशी सूचना करताना दिसत होते. नगरसेवकही त्याला संमती देत या गोष्टीसाठी दुसरे काय उत्तर, हे शोधण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांनी विकासकामांची अपेक्षा न बाळगता फक्त लक्ष्मीदर्शनालाच महत्त्व देण्याची पद्धत भविष्यात धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.निवडणूक आयोगासह अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान राबवून मतदानाबद्दल नागरिकांत जनजागृती केली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढल्याचे दिसत आहे. मात्र, याबाबतच्या जनजागृतीचे काय, याला रोखणार कोण, आयोगाने कितीही यंत्रणा राबविली तरी छुप्या पद्धतीने व वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मतदारांपर्यंत लक्ष्मीदर्शन केले जात आहे. सभांच्या गर्दीचे सूत्रधारनिवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक सभा घेतात. या सभांमध्ये गर्दी व्हावी यासाठी ‘यंत्रणा’ राबवून कार्यकर्ते गर्दी खेचून आणतात. यासाठी एक विशिष्ट ठेकेदार निर्माण झाले असून, त्यांना ठरावीक ठेका दिला की, ते सभेसाठी गर्दी पुरवितात. यामध्ये स्त्री-पुरुषांसाठी वेगळा दर काढून त्यातून आपला हिस्सा ठेकेदार बाजूला ठेवतात. अनेकवेळा सभा संपल्यानंतर अशा ठेकेदारांबरोबर आलेल्या गर्दीची देव-घेवीवरून वादावादी सुरू असल्याचे दिसते. अतिशय सावधानतेने ही यंत्रणा राबविली जाते.जनसामान्यांचे मतयाबाबत काही लोकांशी संवाद साधला असता, हे लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर ‘यंत्रणा’ राबवून स्वत:चा ‘मोठा’ फायदा करून घेतात. मग आम्ही काय घोडे मारले. आमचीच लक्ष्मी आमच्याकडे येत असेल, तर त्यात वावगे काय, अशी तिखट प्रतिक्रिया ऐकावयास मिळाली.
नगरसेवकांना धडकी
By admin | Updated: October 23, 2014 00:09 IST