हरी बुवा
शिये : कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून शिये - कसबा बावडा रस्ता सोयीचा मानला जातो. मात्र, रात्रीच्या वेळी या मार्गावर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असल्याने बहुतांशजण या मार्गावरून प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर स्ट्रिट लाईट व शिये फाटा येथे हायमास्ट दिवे लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पुणे, मुंबईकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करण्याकरिता शिये बावडामार्ग हा वाहनधारकांना सोईचा आहे. त्याचबरोबर शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी या मार्गावर नेहमी वर्दळ असते. शिये फाटा येथे आल्यावर कमी प्रकाश देणारे विद्युत बल्ब असल्याने वाहनचालकांची रात्रीच्या वेळेत येथे दिशाभूल होते. त्यामुळे शिये फाटा येथे हायमास्ट दिवे लावण्याची गरज आहे. शहरातून बावडा पुलापर्यंत महापालिकेच्यावतीने विद्युत दिव्यांची सोय केली आहे; पण कसबा बावडा फुलावर येताच अंधाराचा सामना वाहन चालकांना करावा लागतो आहे. बावडा पूल ते शिये फाटा या दरम्यान विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळेत अपघाताची भीती व्यक्त होत आहे. परमार पेट्रोलपंप ते शिये फाटा या दरम्यान विद्युत दिव्यांचे खांब आहेत; पण ते कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहेत. शिरोली औद्योगिक महामंडळाकडून या विद्युत दिव्यांची देखरेख केली जात होती; पण हा रस्ता पीडब्ल्यूडी अंतर्गत येत असल्याने येथील विद्युत खांबांची दुरुस्ती करण्यास अडथळे येत असल्याचे औद्योगिक महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. शिये-बावडा रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तसेच पहाटे फिरण्यासाठीही शहरातून बहुतांशजण या रस्त्याचा वापर करतात. मात्र, बावडा पुलापासून पुढे लाईट नसल्याने अपघाताची भीती आहे. परमार पेट्रोल पंप तेे बावडा पुलाापर्यंत पीडब्ल्यूडीने स्ट्रिट लाईट बसविण्याची गरज आहे.
कोट : शिये फाटा येथे कमी प्रकाश देणारे विद्युत खांब आहेत. रात्रीच्या वेळेस येथे वाहनांची दिशाभूल होत असल्याने छोटे-मोठे अपघात वारंवार होत आहेत. या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याची गरज आहे. निवास पाटील, रिक्षा चालक
कोट : हा रस्ता पीडब्ल्यूडीच्या अंर्तगत येत असल्याने येथील काम करण्यास अडथळे येत आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव येथील एलईडी बल्ब बसविण्याकरिता मुख्य कार्यालयात प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. त्याचा पाठपुरावा करून संबंधित जागेवरील बल्ब लवकरच बसवू. व्ही. व्ही. पात्रवट, कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.