कोल्हापूर : कोंकण किनारपट्टीजवळच्या पश्चिम घाटातील अरण्यांत शिवाजी विद्यापीठाचे संशोधक डॉ. अमृत भोसले यांनी नवीन गोगलगाईच्या प्रजातीचा शोध लावला. रत्नागिरी जिल्ह्यातील अनसुरे येथील देव गिरेश्वर मंदिराजवळ गोगलगायीची ही नवीन प्रजात आढळली. कोकणात आढळल्यामुळे 'थिओबालडियस कोंकणेंसिस' असे या नव्या प्रजातीचे नामकरण केले आहे.
शोधनिबंधाचे लेखक प्रा.दहिवडी कॉलेजचे संशोधक प्रा.डॉ. अमृत भोसले यांनी शिवाजी विद्यापीठातून गोगलगाय आणि शिंपले या विषयावर पी. एच. डी पूर्ण केली आहे. ते सध्या पश्चिम घाटातील गोगलगाईंवर संशोधन करत आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत २०२१ मध्ये संशोधन करताना संशोधकांना ही प्रजाती अनसुरे गावाजवळ देव गिरेश्वर मंदिराच्या बाजूच्या झाडीत ओलसर पाळापाचोळ्यात आढळली. मोलुस्कन रिसर्च या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर, मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ओमकार यादव, नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडनचे संशोधक डॉ. टॉम व्हाइट आणि राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक डॉ. दिनारझार्दे रहीम या संशोधकांनी त्यांना मदत केली.
शंखाची वेगळी रचना
या गोगलगाई समुद्रसपाटीपासून ८० ते २४० मीटर उंचीवरील सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळतात. शंखाच्या आणि शंखाच्या झाकणावरच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे इतर थिओबालडियस वंशातील गोगलगाईंच्या प्रजातींपेक्षा ही वेगळी आहे. शंखाची रचना, त्याची लांबी, रुंदी, शंखाच्या तोंडाजवळ विशिष्ट प्रकारची खाचेची उठावदार कडा आणि शंखाच्या झाकणावरील छोट्या काट्यांसारख्या रचना ही वैशिष्ट्ये या प्रजातीत आढळली.
देव गीरेश्वर मंदिर (अनसुरे , रत्नागिरी), उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान (चिखली, चिपळूण-गुहागर रस्ता, रत्नागिरी), केशरनाथ विष्णू मंदिर (शेडवई, रत्नागिरी) आणि फणसाड अभयारण्य, रायगड.
कोकणातील गोगलगाईंबद्दल तुलनेने कमी संशोधन झाले. स्थानिक परिसंस्थेमध्ये या नवीन प्रजातीची भूमिका समजून घेण्यासाठी तसेच जैवविविधतेसाठी या गोगलगाईंवर सखोल संशोधन करण्याची गरज आहे.
-डॉ. अमृत भोसले, संशोधक.