धनाजी सूर्यवंशीने आपल्या खेळाने शिवाजी मंडळाला अनेक जेतेपद मिळवून दिली आहेत. शिवाजी विद्यापीठ संघात त्याची सलग पाचवेळा निवड झाली होती. फुटबॉलशिवाय क्रिकेटमध्येही त्याला गती होती.धनंजय ऊर्फ धनाजी सयाजीराव सूर्यवंशी याचा जन्म ४ मार्च १९७२ रोजी झाला. धनंजयला धनाजी या नावानेच सर्वजण ओळखतात. बराच काळ त्याचे वास्तव्य शिवाजी पेठेत असल्याने पेठेतील खेळाडूंसह तो सराव करत असे. टेनिस बॉलच्या साहाय्याने गांधी मैदानात अथवा न्यू कॉलेजच्या मैदानावर तो सराव करत असे. लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये तो सेंटर फॉरवर्डला खेळत असे. ४ फूट ११ इंच उंचीच्या सामन्यात तो आपल्या संघाचा नायक असे. धनाजी दरम्यानच्या काळात महाराष्ट्र हायस्कूल येथे दाखल झाला. मात्र, हा गुणी खेळाडू महाराष्ट्र हायस्कूलमधून शालेय स्तरावर का खेळला नाही हे एक रहस्यच आहे. पुढे त्याने न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज स्तरावर फुटबॉलचे सर्व तंत्र त्याने आत्मसात केले होते. विशेषत: त्याचे बॉल ड्रिबलिंंगमधील कौशल्य खूपच चांगले होते. एकदा त्याच्या पायात बॉल आला की बॉडी टॅकलिंंगचा उपयोग करून तो हमखास गोल करीत असे. प्रा.कै. शिवाजीराव घोरपडे यांनी केलेले मार्गदर्शन तो कधीही विसरत नाही.धनाजी न्यू कॉलेजमध्ये आला त्यावेळी तो परिपक्व खेळाडू झाला होता. कॉलेजच्या संघात त्यास सेंटर फॉरवर्ड ही जागा फार महत्त्वाची, कारण पेनल्टी एरियात बॉल मिळताच गोल स्कोअरमध्ये रूपांतर करणे हे सेंटर फॉरवर्डचे काम आणि धनाजीने ही किमया अनेकवेळा पूर्ण करून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या आहेत. त्याच्या हॉफ व्हॉली, फुल्ल व्हॉली, साईड व्हॉली व लो ड्राईव्ह या किक्स जोमदार असायच्या. कित्येकवेळा त्याच्या खेळात नजाकत होती. कॉलेजच्या संघातून खेळत असतानाच समांतर स्थानिक, पेठेतील शिवाजी तरुण मंडळ या संघातून फॉरवर्डलाच खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्याचा गतिमान खेळ पाहून शिवाजी विद्यापीठ संघात त्याची सलग पाच वेळा निवड झाली होती. त्याच्यामध्ये जबरदस्त सांघिक भावना होती. विद्यापीठ स्तरावर त्याने चमकदार कामगिरी केली. पश्चिम विभागीय स्पर्धेत खेळताना त्या-त्या ठिकाणच्या प्रेक्षकांना त्याने आपल्या खेळाद्वारे आपलेसे केले होते. याच दरम्यान शिवाजी तरुण मंडळाने त्याला संधी दिली. वर्षभर होणाऱ्या सर्व स्थानिक स्पर्धांत धनाजीने आपल्या नेत्रदीपक खेळाने अनेक चषक जिंंकून दिले आहेत. याचबरोबर बाहेरगावी मिरज, सांगली, पुणे, मुंबई, गडहिंग्लज, आदी ठिकाणी धनाजीने कित्येक वर्षे स्पर्धा गाजविल्या आहेत. वयाच्या १९ व्या वर्षांपासून त्याने खेळास सुरुवात केली. सलग २२ वर्षे सेंटर फॉरवर्ड या जागी तो खेळला आहे. त्याने खेळणे बंद केले असले तरी दिलबहार या स्थानिक संघासाठी तो प्रशिक्षण देत आहे. त्याने काही वर्षे महाराष्ट्र हायस्कूल फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. फुटबॉलशिवाय धनाजीने क्रिकेटमध्येही चांगलेच प्रावीण्य मिळविले आहे. त्याच्या जीवनात घडलेली अविस्मरणीय आठवण तो सांगतो. १९९२ मध्ये पी.टी.एम. विरुद्ध शिवाजी मंडळ असा सामना सुरू होता. पी.टी.एम. ३-१ असा गोलफरकाने आघाडीवर होता. सामना संपण्यास ३-४ मिनिटे शिल्लक असताना धनाजीने पी.टी.एम.वर दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. अखेर टायब्रेकवर ‘शिवाजी’ने हा सामना जिंंकला. धनाजीच्या मतानुसार आज फुटबॉल खेळ वाढला, स्पर्धा वाढल्या, खेळाडूंची संख्या वाढली, खेळाडूंना पैसा मिळू लागला, बक्षिसे वाढली; पण खेळात प्रगती झाली नाही. --प्रा. डॉ. अभिजित वणिरे(उद्याच्या अंकात : संजय हंचनाळे)
‘शिवाजी’ची तुफान मेल धनाजी सूर्यवंशी
By admin | Updated: February 15, 2017 20:25 IST