कुरुंदवाड : आलास (ता. शिरोळ) येथील एका घरातून १० तोळे सोने चोरलेल्या अज्ञात चोरट्यास अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आले आहे. सतीश बाळासो सावंत (वय ४३ रा. पुष्पक टाॅकीजच्या मागे, शिरोळ) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चारचाकी वाहनासह ४ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीची फिर्याद दीपाली दत्तात्रय कोळी (रा. आलास) यांनी पोलिसांत दिली होती.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोळी याच्या घरी ३ जानेवारी नातेवाईक आले होते. संशयित आरोपी सावंत हा त्यांचा गाडीचा ड्रायव्हर होता. यावेळी हॉलमधील पर्समध्ये ठेवण्यात आलेले १ लाख २० हजार रुपये किमतीची दोन पाटल्या, १ लाख २० हजार किमतीची सोन्याची बिलवर, ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रुपयाचे मिनी गंठणची चेन, २ हजार ५०० रुपये किमतीची चांदीची पैंजण असा एकूण नऊ तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ६० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सावंत याने चोरले होते.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, साहायक पोलीस निरीक्षक विकास आडसूळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय घाडगे, पोलीस नाईक प्रकाश हंकारे, पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे, संजीव मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फोटो. कोलवर - आलास, ता. शिरोळ चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सतीश सावंत याच्यासह चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह पोलीस पथक.