शिरोली : शिरोली एमआयडीसीत अवैध गुटखा विक्री करताना नामदेव कृष्णा गावडे (रा. शिरोली) याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडील मारुती व्हॅन आणि गुटख्याच्या पाच बॅगा असा एक लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अधिक माहिती अशी, नामदेव गावडे हा मारुती व्हॅन (एमएच0९-६४४१)मधून कर्नाटकातून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरूनच गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी शिरोली एमआयडीसीत सापळा रचला. गावडे हा सकाळी साडेअकरा वाजता मारुती व्हॅनमधून गुटखा घेऊन बादल पान शॉपमध्ये आला. त्याने गाडीमधील गुटख्याचे पुडे काढून पान शॉप मालकाला विकताना पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडील गुटख्याच्या पाच बॅगा आणि मारुती व्हॅन असा एक लाख ४३ हजारांचा माल जप्त केला. गावडे याला शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले असून, शिरोली पोलिसांनी अटक केली. (वार्ताहर)
शिरोलीत गुटखा जप्त
By admin | Updated: February 8, 2015 01:04 IST