कोल्हापूर : शिरोली नाक्यावर आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली टोलवसुली आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंद पाडली. टोलवसुलीच्या आदेशाची मागणी करत क्षीरसागर यांनी तासभर नाक्यावर ठिय्या मांडला. आमदारांच्या आक्रमकपणामुळे नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वसुली बंद करत तत्काळ पळ काढला. पोलीस प्रशासनाने संयमी भूमिका घेत प्रकरण हाताळत टोलवसुलीची तक्रार दाखल करण्यासाठी क्षीरसागरांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले. सर्व प्रकारामुळे नाक्यावर काही काळ तणाव होता. पाच वाजण्याच्या सुमारास टोलवसुली सुरू झाली. आयआरबीचे कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडवून टोल देण्याबाबत विनंती करत होते. अनेक वाहनधारक टोल देणार नाही, असे ठणकावून सांगत पुढे जात होते. सहा वाजण्याच्या सुमारास आमदार राजेश क्षीरसागर टोलनाक्यावर आले. नाक्यावरील व्यवस्थापक कुठे आहे? टोलवसुली कोणत्या आदेशाआधारे करत आहात? आदेश दाखवा. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे आहेत काय, अशी विचारणा पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे केली. टोलवसुली बंद करा, असे क्षीरसागर यांनी ठणकावताच, नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. वसुलीचा आदेश दाखविल्याखेरीज नाके सुरू करु देणार नाही, असे सांगत क्षीरसागर यांनी नाक्यावर ठिय्या मांडला.
शिरोली नाका बंद पाडला
By admin | Updated: June 17, 2014 01:48 IST