कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी दाखल अर्जांची छाननी झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी विरोधी राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांची शासकीय विश्रामगृहात खलबते झाली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी इतर नेत्यांसमवेत चर्चा केली.
छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद ठरतो, याकडे दोन्ही आघाड्यांचे बारीक लक्ष होते. तशी त्या ठिकाणी यंत्रणा लावली होती. विरोधी आघाडीचे नेते शासकीय विश्रामगृहात एकत्रित आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना व लसीकरणाबाबतची बैठक संपवून मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शासकीय विश्रामगृहात गेले. ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर बैठक झाली. यामध्ये छाननी आणि त्यानंतरच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील हे सायंकाळी मुंबईला रवाना झाले. गुरुवारी (दि. ८) ते कोल्हापुरात येत असून, त्यानंतर पॅनल बांधणीस वेग येणार आहे.
बैठकीला आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विश्वास पाटील, विजयसिंह माेरे आदी उपस्थित होते.