कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची दिल्लीत मंगळवारी खासदार शाहू छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणे का आवश्यक आहे याची विविध मुद्द्यांवर आवश्यकता पटवून दिली. आपल्या कारकिर्दीतच हे सर्किट बेंच सुरू व्हावे, अशी आग्रही इच्छा त्यांनी सरन्यायाधीश गवई यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे ही उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी गवई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर कोल्हापूरला न्यू पॅलेसमध्ये येऊन शाहू छत्रपती यांची भेट घेतली होती. त्यावेळी छत्रपती परिवाराने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या होत्या. राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, असे उद्गार त्यावेळी गवई यांनी काढले होते.न्यू पॅलेसवरून निरोप घेताना गवई यांनी खासदार शाहू छत्रपती यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यानच्या काळात ते सरन्यायाधीश झाले. मंगळवारी दिल्ली येथे दोघांची भेट झाली.
सरन्यायाधीश गवई यांची शाहू छत्रपतींनी घेतली भेट, सर्किट बेंचसंदर्भात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:26 IST