कोल्हापूर : शहरातील टेंबलाईवाडी ते बीएसएनएल टॉवरनजीक एका झाडाखाली गेल्या दहा दिवसांपासून असलेल्या एका अनोळखी मनोरुग्णाला बुधवारी दुपारी ‘व्हाईट आर्मी’च्या पथकाने येथील सावली केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले. केस, दाढी वाढलेली, अंगावर पुरेसे कपडेही नसलेल्या व अर्धवट उपाशीपोटी असलेल्या या ३८ ते ४२ वर्षीय पुरुषास परिसरातील काही नागरिक थोडाफार नाश्ता, पाणी देऊन पुढे जात होते. मात्र, त्याची पुरेशी देखभाल होत नसल्याने व तो बेवारस असल्याने यापलीकडे त्याची अधिक दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे त्याची तब्येत अधिकच खालावल्याने तो जागेवरून उठू शकत नव्हता. या घटनेची माहिती रुईकर कॉलनीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते व त्रिमूर्ती स्पोर्टस्चे शाम नायर यांना समजली. मंगळवारी सायंकाळी त्याला नायर व त्यांचे सहकारी योगेश जाधव, रोहित सवाईराम, अनिकेत यादव यांनी पुरसे अन्न, पाणी देऊन, त्याच्या अंगावर कपडे घातले. त्यानंतर बुधवारी सकाळी ‘सावली केअर सेंटर’चे प्रकल्प अधिकारी किशोर देशपांडे यांच्याशी संपर्क साधून या अनोळखी व्यक्तीसंदर्भात माहिती दिली असता देशपांडे यांनीही तत्काळ त्यास सावली सेंटरमध्ये आणण्यासाठी परवानगी दिली. व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांच्याशीही संपर्क साधला. त्या मनोरुग्ण अनोळखी व्यक्तीस व्हाईट आर्मीच्या पथकातील प्रशांत शेंडे व सहकारी विनायक भट यांनी रुग्णवाहिकेतून नेण्याची व्यवस्था करून, त्याला अधिक उपचारासाठी येथे दाखल केले. ‘सावली’सारख्या संस्था अशा मनोरुग्णांना सहकार्य करीत असतात. व्हाईट आर्मीचे पथकही अशा बेवारस, मनोरुग्ण यांना तत्काळ उपचारासाठी पुढाकार घेत असते. सामाजिक बांधीलकी म्हणून नागरिकांनीही सर्वतोपरी सहकार्य केल्यास अशा लोकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. घरच्या लोकांनीही अशा व्यक्तींना निराधार बनवू नये, त्यांची योग्य काळजी घ्यावी.- प्रशांत शेंडे, कोल्हापूर.
‘त्या’ मनोरुग्णाला ‘सावली’चा आधार!
By admin | Updated: February 16, 2017 18:39 IST