भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परिते (ता. करवीर) येथील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या तीन अनाथ मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे आज, शुक्रवारी उघडकीस आले. समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शाळेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित तीन मुलींनी लैंगिक शोषण झाल्याची कबुली दिली. तिन्ही मुलींना सायंकाळी उशिरा कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. शाळेतील शिक्षकानेच शोषण केल्याचे अत्याचारग्रस्त मुलींनी सांगितले. येथील कसबा बावड्यामधील स्वयंम शाळेत अनाथ मतिमंद १३ मुली होत्या. त्या संस्थेला अनुदान नव्हते. त्यामुळे जुलै २०१४ मध्ये संस्थेने शाळा बंद केली. त्यानंतर मुलींच्या पालकत्वाचा प्रश्न निर्माण झाला. बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली. काही दिवस त्या मुली तेथे राहिल्या. सुधारगृहात त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याची सुविधा नसल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण प्रशासनाने परितेमधील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेत या मुलींना दाखल केले. तेथे वसतिगृहात राहून मुली शिकत होत्या. अशा संस्थेत शिकणाऱ्या मुली या शासनकन्याच असतात. कारण शासनच त्यांचे पालक असते. त्यामुळे वसतिगृहातील अशा प्रकरणाने सरकारी यंत्रणाही हादरली आहे. दरम्यान, ३ जानेवारीला एका मुलीवर शिक्षकाने अत्याचार करत लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी वसतिगृहातून बाहेर पडली. ती येथील बालसुधारगृहात आली. ती मुलगी एका कर्मचाऱ्याच्या मदतीने गुरुवारी येथील समाजकल्याण विभागात येऊन अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. आज, सकाळी समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांसह पथकाने शाळेला भेट दिली. मुख्याध्यापक संभाजी अतिग्रे, अध्यक्ष विजय कांबळे, शिक्षक कृष्णा भोसले यांच्याकडे चौकशी करून रितसर जबाब नोंदवून घेतला. ३ जानेवारीला मुलगी वसतिगृहातून बाहेर पडली असतानाच पोलिसांत वर्दी का दिली नाही याची विचारणा केली. चौकशीत मुलींनी लैंगिक शोषण झाल्याचे सांगितल्याचे समाजकल्याण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिन्ही मुलींना सायंकाळी सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. त्या मुली १८ वर्षांवरील आहेत. किती दिवसांपासून अत्याचार...लैंगिक शोषण असाह्य झाल्याने ३ रोजी वसतिगृहातून मुलगी बाहेर पडल्याने हा प्रकार उघड झाला. तीन मुलींचे शोषण झाल्याचेही पुढे आले. परंतु, किती दिवसांपासून त्या तीन मुलींचे शोषण होत होते हे आता तपासात पुढे येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरा लैंगिक शोषण केलेल्या शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.काळीमा लावणारे कृत्य..अनाथ आणि मतिमंद अशा मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेऊन शिक्षकाने अत्याचार करत माणुसकीला आणि शिक्षकीपेशालाच काळीमा फासण्याचे काम केले आहे. तो शिक्षक जवळच्या गावचा आहे. शिवाय तो संस्थाचालकाचा नातेवाईकच असल्याचे समजते. पोलिसांकडे प्रकरण केल्यानंतर आणखी कारनामे पुढे येण्याची शक्यता आहे.लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलीने महिलेसोबत गुरुवारी माझ्याकडे तोंडी तक्रार केली. त्याची दखल घेऊन आज मी परिते (ता. करवीर) येथील अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेच्या वसतिगृहाला भेट दिली व चौकशी केली. चौकशीत मुलींनी लैंगिक शोषण केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासासाठी मुलींना सीपीआरला पाठविले आहे. अधिक तपासासाठी पोलिसांतही फिर्याद देणार आहे.- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी
तीन अनाथ मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण
By admin | Updated: January 10, 2015 00:58 IST