शिरोली : राजाराम सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी आहेत. ते थांबविण्याचे सभासदांच्या हातात आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिरोली येथील सभासदांच्या मेळाव्यात केले. शशिकांत खवरे यांच्या घरी सभासदांचा मेळावा आयोजित केला होता. सतेज पाटील म्हणाले, राजाराम कारखाना हा सहकारी तत्त्वावर चाललेला आहे; पण महाडिक कंपनी आणि सत्ताधारी या कारखान्याचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहेत. कारखान्याचे बारा हजार सभासद असून, त्यातील बऱ्याच सभासदांच्या नावावर ऊसच जात नाही, तर कारखान्याचे अध्यक्ष आणि बगलबच्च्यांच्या नावावर मात्र हजारो टन ऊस कसा जातो आणि जे खरे शेतकरी सभासद आहेत, त्यांचा ऊसच न्यायचा नाही, सभासद ऊस कारखान्याला पाठवत नसल्याचे कारण पुढे करत सभासदत्वच रद्द करण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. मात्र, स्वाभिमानी सभासद हे कदापि सहन करणार नाहीत. यावेळी सभासदांच्या जिवावर सक्षम पॅनेल उभा करणार आहे. महाडिक विरोधकांना एकत्र आणून यावेळी कारखान्याचे सभासदच परिवर्तन करतील. कारखान्यातून महाडिकांची सत्ता घालवण्यासाठी सतेज पाटील यांच्या पाठीशी शिरोलीकर खंबीरपणे उभे राहतील. शिरोली, नागाव, टोप, संभापूर या गावांतून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊ, असे काँग्रेसचे नेते शशिकांत खवरे म्हणाले. शिरोली परिसरातील शिवसेना आणि शाहू आघाडी सतेज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून प्रचारात आघाडीवर असेल. कारखान्यात सत्तांतर झालेच पाहिजे, असे जि. प.चे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार, परिवहन सभापती अजित पोवार, अनिल खवरे, योगेश खवरे, उत्तम खवरे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांना घरी बसवा
By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST