उदगांव : उदगांव (ता. शिरोळ) येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी जयसिंगपूर पोलिसांनी पोलीस चौकी सुरू केली. परंतु ग्रामपंचायतीने दिलेल्या गाळ्यातून आठच दिवसांत साहित्य फलकासह पोलीस चौकीचे साहित्य इतरत्र हलवून अचानक चौकी बंद करण्यात आली होती. गावात सध्या होत असलेल्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंद केलेली पोलीस चौकी तत्काळ सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासणे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, उदगांव हे २२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. वारंवार महामार्गावर होत असलेले चोरी, अपघात, गावातील हाणामारीसह विविध गुन्हे यासह अनेक बेकायदेशीर धंदे उदगांवमध्ये सुरू आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर येथील टोलनाक्यावर पोलीस चेक नाका उभारण्यात आला आहे. याचा फायदा उदगांवमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी होत नाही. गतवर्षी तत्कालीन पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी तत्काळ पोलीस चौकी सुरू करावी, असे आदेश पोलीस उपअधीक्षक यांना दिले होते. मात्र, जयसिंगपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बंद झालेली पोलीस चौकी सुरू झाली नाही. त्यामुळे तत्काळ पोलीस चौकी सुरू करावी, असे म्हटले आहे.
फोटो - ०८०९२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासणे यांनी निवेदन दिले.