निकेत पावसकर - नांदगाव , केवळ छंद म्हणून मी सात वर्षांपूर्वी सर्प पकडायला लागलो. माझ्या या छंदाबद्दल घरात विरोध आणि आश्चर्यही व्यक्त करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता हे काम विनामोबदला सेवा म्हणून करीत असल्याचे मत राजापूर येथील सर्पमित्र अमर जयप्रकाश नार्वेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.गेल्या सात वर्षात त्यांनी सुमारे १६ प्रकारच्या ३५० पेक्षा जास्त विषारी व बिनविषारी जातींचे सर्प पकडून त्यांना जीवदान दिले आहे. कोणत्याही वेळेला, कोणत्याही ठिकाणाहून घरात, बागेत सर्प आल्याचा फोन आला की, कशाचीही वाट न पाहता घटनास्थळी उपस्थित राहून सर्पाला पकडून त्याला दूरच्या जंगलात सोडून देणे, असा दिनक्रम गेली सात वर्षे नार्वेकर यांचा चालू आहे. गेल्या सात वर्षातील अविस्मरणीय प्रसंग कोणता? यावर बोलताना अमर नार्वेकर म्हणाले की, मी सर्प पकडायला लागलो त्यानंतर सहावा सर्प असावा तो. अगदीच जवळ होता. प्रथमदर्शनी मला आदले वाटले मात्र नंतर निरखून पाहिले असता तो नाग असल्याचे निदर्शनास आले. एकदमच जवळ असल्यामुळे थोडी काळजी तर होतीच.सुरुवातीला सर्प पकडलात त्यावेळी अनुभव कसा होता? असे विचारले असता ते म्हणाले की, माझ्या मित्राच्याच घरी चापडा जातीचा सर्प होता. तो पकडला आणि सुरुवात झाली. अलिकडेच सर्प पकडण्याची काठीही मी घेतलीय असे सांगतानाच पुढे म्हणाले की, सर्पमित्रांसाठी शासनानेही मदत केली पाहिजे. सर्पमित्र आपला जीव धोक्यात टाकून पदरमोड करून हे काम करीत असतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता एक आवड आणि सेवा म्हणून हे काम करीत असतो. यासाठी शासनाने मदत केली पाहिजे. कोणत्या प्रकारचे सर्प पकडलेत? यावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, विषारी सर्पांमध्ये नाग, घोणस, फुरसे, चापडा, मण्यार तर बिनविषारी सर्पांमध्ये दिवड, धामण, नाणेटी, हरणटोळ, डुरक्या घोणस, मांडूळ, गवत्या चित्तांग नायकूळ, अजगर, दुतोंड्या अशा विविध जातींचे सुमारे ३५० सर्प पकडलेत. या सर्व सर्पांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता दूरच्या जंगलात सोडून दिले. राजापूरसह भू, बारसू, तिथवली, हातिवले व ओणीसह असंख्य ग्रामीण भागात जावून मी सर्प पकडलेत. त्या सर्वांना राजापूर येथील रानतळी व डुंगी या जंगलात आणून सोडलेत. माझ्या या छंदामुळे घरातल्यांना आश्चर्य वाटलेच आणि धक्काही मिळाला. काही मित्र सांगायचे पकडू नकोस तर काहीजण प्रोत्साहनही द्यायचे.
विनामोबदला सर्पमित्र म्हणून सेवा
By admin | Updated: August 5, 2014 00:03 IST