जयसिंगपूर : जयसिंगपूर आणि परिसरातील हॉस्पिटल्सकडून जादा बिलांची आकारणी केली जात आहे. याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने डॉक्टरांचेही फावले आहे. ऑडिटरची नेमणूक केली. मात्र, त्यांच्याकडूनही गोरगरीब रुग्णांना न्याय मिळत नसल्याने जादा बिलांबद्दल जयसिंगपूर येथे आज, सोमवारी शाहू महाराजांच्या पुतळ्यांसमोर आत्मक्लेष आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिली.
कोरोना काळात शासकीय यंत्रणा मदत कार्यात कमी पडत आहे. नागरिकांना लस मिळत नाही. ऑक्सिजनची तर आणीबाणी सुरू आहे. रेमडेसिवरची टंचाई असल्याने हजारो रुपये मोजूनही मिळत नाही. दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांसह सर्वांचीच वणवण सुरू आहे. अशा स्थितीत रुग्णांकडून शहरातील हॉस्पिटल्सकडून अव्वाच्या-सव्वा बिलांची आकारणी केली जात आहे. सर्वसामान्यांकडून ही लूट पाहत बसण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याची स्थिती आहे. जयसिंगपूरमधील काही हॉस्पिटलकडून भरमसाट बिले घेऊन रुग्णांची पिळवणूक केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.