कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारी पेठेतील शाहूकालीन शिवतीर्थ विहिरीची शोधमोहीम सह्णाद्री इतिहास संशोधक केंद्राने हाती घेतली आहे. त्या दृष्टीने आज, गुरुवारी प्राथमिक पाहणी केली.करवीरनगरीतील उद्योग-व्यापाराला गती मिळावी या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज यांनी शहरात शाहूपुरी व्यापारी पेठ वसविली. येथे असलेल्या व्यावसायिक-व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. त्यावर त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडे विहीर खोदण्यासाठी जागेची मागणी केली. त्यावर त्यांनी व्यापाऱ्यांना भूखंड दिला. व्यापाऱ्यांनी तेथे विहीर खोदली. त्यामुळे त्यांची पाणीटंचाई दूर झाली. पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे व्यापाऱ्यांनी या विहिरीला प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ‘शिवतीर्थ’ असे नाव दिले. सध्या शाहूकालीन आठवणी काळाच्या पडद्याआड जात आहेत. राजर्षी शाहूंच्या कार्याच्या साक्षीदार असलेल्या वास्तू अन्य बाबींची चिरंतन आठवण राहणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. त्यादृष्टीने सह्णाद्री इतिहास संशोधक केंद्राने अशा वास्तू, अन्य बाबींची शोधमोहीम हाती घेतली असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, राजर्षी शाहूंनी व्यापाऱ्यांना ‘शिवतीर्थ’ विहिरीसाठी जागा दिल्याचा ठराव कागदपत्रात सापडला आहे. त्यादृष्टीने शोधमोहीम सुरू केली. जागेचा सर्व्हे नंबर, ठरावानुसार शाहूपुरीत पाहणी केली. यात दोन-तीन विहिरींची पाहणी केली. नेमकेपणाने ‘शिवतीर्थ’ शोधणार आहोत. याकामी अभिलेखा अधिकारी गणेश घोडके, अमित आडसूळ, आदींची मदत होत आहे. (प्रतिनिधी)
शाहूपुरीतील ‘शिवतीर्थ’ विहिरीची शोधमोहीम
By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST