इचलकरंजी : शहरात विविध ठिकाणी असलेल्या शाळा इमारतींचा एक कोटी १६ लाख रुपये, तर शासकीय-निमशासकीय कार्यालयांचा तब्बल वीस लाख रुपये घरफाळा व पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती उजेडात आली आहे.इचलकरंजी शहरात असलेल्या मिळकतदारांकडून घरफाळा व पाणीपट्टी युद्धपातळीवर जमा करण्याची मोहीम नगरपालिका कर खात्याने हाती घेतली आहे. खासगी मक्तेदारांवर थकीत वसुलीसाठी प्रसंगी पाण्याची जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर संबंधितांच्या मालमत्तांना थकीत कर नोंदविण्याची कठोर कारवाईसुद्धा नगरपालिकांना करता येते. तरीसुद्धा शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकीबाबत नगरपालिका कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालयांपैकी हवामहल बंगला (प्रांताधिकारी कार्यालय) ६५ हजार ५२४ रुपये, शहापूर गावचावडी २० हजार ८३५, नगर भूमापन कार्यालय ३८ हजार ५४९, उपनिबंधक कार्यालय एक लाख २४ हजार ८११, अप्पर जिल्हा न्यायालय (सार्वजनिक बांधकाम विभाग) ९५ हजार ४३५, कर्मचारी विमा योजना कार्यालय ७४ हजार ४१, उत्पादन शुल्क विभाग २६ हजार ४२४, पशुवैद्यकीय दवाखाना दहा हजार ५७३, दारूबंदी व उत्पादन शुल्क कार्यालय ११८५, शिवाजीनगर पोलीस ठाणे ३१ हजार २९७, शहर वाहतूक नियंत्रण पोलीस सात हजार ९८२ अशा प्रकारची घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी आहे.तसेच नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील असलेल्या शाळांच्या इमारतींचा एक कोटी १६ लाख ६६ हजार रुपये इतका घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी आहे. प्राथमिक शिक्षण मंडळांना पूर्वी सरकारकडून शिक्षक वेतनेतर अनुदान मिळत असे. त्यावेळी शिक्षण मंडळ घरफाळा व पाणीपट्टी या अनुदानातून भागवत असे. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून अनुदान बंद झाल्याने मोठ्या रकमेची घरफाळा व पाणीपट्टी थकीत राहिली आहे. (प्रतिनिधी)
शाळांचा १.१६ कोटी घरफाळा थकीत
By admin | Updated: March 12, 2015 23:50 IST