कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शनिवारी (दि. १६) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. मंत्री गायकवाड यांचे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता बेळगाव विमानतळावरून मोटारीने कोल्हापूरमध्ये आगमन होईल. दुपारी एक वाजता कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होईल. दुपारी अडीच वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्याहस्ते शिक्षण जागर पुरस्काराचे, तर दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र हायस्कूल येथे डी. बी. पाटील पुरस्काराचे वितरण होणार आहे. दुपारी साडेचार वाजता देवज्ञ बोर्डिंगमध्ये होणाऱ्या राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षक मेळाव्यास त्या उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय विश्रामगृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक त्या घेणार आहेत. विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या भेटणार आहेत. सायंकाळी सात वाजता आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गायकवाड यांच्याहस्ते होईल. रात्री मुक्काम करून त्या रविवारी सकाळी नऊ वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उद्या कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST