संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेळापत्रकात बदल, दोन विषयांसाठी एक वही, वर्ग कोपरा आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून कोल्हापुरातील विद्यापीठ मराठी शाखा शाळेने दप्तराचे ओझे घटविले आहे. त्यांनी हे ओझे नऊ किलोवरून दोन-तीन किलोवर आणले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही शाळा राबवत असलेल्या ‘नको दप्तराचे ओझे, आनंददायी शिक्षण माझे’ उपक्रमातून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.येथील अंबाबाई मंदिराजवळ राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेल्या जागेत सन १९३४ मध्ये विद्यापीठ मराठी शाखेची सुरुवात झाली. याठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. सध्या शाळेतील पटसंख्या ३४० इतकी आहे. दप्तराचे वाढते ओझे ही विद्यार्थी आणि पालकांची समस्या सोडविण्यासाठी चार वर्षांपूर्वी शाळेने पाऊल टाकले. यासाठी मुख्याध्यापक पंडित मस्कर यांनी अन्य शिक्षकांच्या सहकार्याने काही संकल्पना राबविल्या. त्यांनी दैनंदिन अध्यापनाच्या वेळापत्रकात बदल केला. त्यात त्यांनी रोज दोन अथवा तीन विषयांचे अध्यापन करण्याचे नियोजन केले. मराठी-इंग्रजी, गणित-इतिहास अशा दोन-दोन विषयांसाठी एक वही, कार्यानुभव, चित्रकला, पाढे, शुद्धलेखन विषयाच्या वह्या वर्गातच ठेवण्यासाठी स्वतंत्र कोपरा, कपाटाची सुविधा केली. ई-लर्निंगअंतर्गत बहुतांश अभ्यासक्रम प्रोजेक्टरवर शिकविण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची रोजची पाच-सहा पुस्तके आणि तितक्याच वह्यांचे प्रमाण कमी होऊन ते दोन वह्या, दोन पुस्तकांवर आले. वॉटर बॉटल, वॉटर बॅगचे ओझे टाळण्यासाठी शाळेतच शुद्ध पाण्याची सुविधा केली. त्यामुळे हे ओझे दोन ते तीन किलोवर आले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी बनविण्याचा या शाळेचा दप्तराचे ओझे कमी करण्याचा उपक्रम अन्य शाळांना आदर्शवत ठरणारा आहे.उपक्रमाचा सकारात्मक परिणामकिमान नऊ किलो इतके दप्तराचे ओझे असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास व्हायचा. यावर पर्याय म्हणून वेळापत्रकात बदल, वर्ग कोपरा आदी उपक्रम राबविले. त्यामुळे हे ओझे कमी झाले आहे. शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शाळांना सूचना करण्यापूर्वीच आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्याला शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी चांगली साथ दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, टेरेस गार्डनद्वारे पर्यावरण रक्षणाचे धडे, शनिवारी विना दप्तरशाळा, आदी उपक्रम राबविले जातात. आयएसओ मानांकनासाठी शाळेचे प्रयत्न सुरू आहेत. -पंडित मस्कर, मुख्याध्यापक दप्तराचे ओझे अधिक असल्याने शाळेत आणि घरी आल्यानंतर विद्यार्थी थकून जायचे. इतके ओझे त्यांना शारीरिकदृष्ट्या झेपत नव्हते. विविध सकारात्मक बदल आणि सुविधा करून शाळेने हे ओझे कमी करण्याचे चांगले पाऊल टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास, खेळण्याची क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीदेखील शाळेने चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. - प्राजक्ता जोशी, पालकशनिवारी भरते ‘विना दप्तर शाळा’दर शनिवारी ‘विना दप्तर शाळा’ भरविण्याची संकल्पना येथे राबविली आहे. यादिवशी विद्यार्थ्यांना योगासने, गाणी, गोष्टी, खेळ आदींच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी शिक्षण दिले जाते. शाळेने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन दहा टक्के ठेवले आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे प्रत्येक सत्रात वजन केले जाते. शिवाय दप्तराचे ओझे दरमहा तपासले जाते.
वेळापत्रक बदल; दप्तराचे ओझे हलके
By admin | Updated: July 12, 2017 01:01 IST