कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूरसह प्रमुख दहा शहरांत खास युवकांसाठी एप्रिलमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचे मोफत कार्यक्रम घेणार असल्याचे विश्वविख्यात जादूगर सतीश देशमुख यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. चांगुलपणाच्या चळवळीअंतर्गत हे कार्यक्रम ‘ऊर्जा’ नावाने होतील.
देशमुख हे मूळचे नाशिकचे असून पोलीस खात्याची पार्श्वभूमी आहे. त्यांनी आजपर्यंत ८० हून अधिक देशात जादूई प्रतिभेचे दर्शन घडवून प्रतिष्ठित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले आहे. देशमुख हे जगातील पहिले असे इल्युजनिस्ट आहेत की त्यांनी १९९२ मध्ये गेट वे ऑफ इंडिया गायब होऊ शकतो, असे बीबीसीवर घोषित केले होते. त्यांच्या जादूचा उपयोग अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा उलगडा करण्यात झाला आहे. त्यांनी आतापर्यंत २८ देशांतील २८ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तोच प्रयत्न आता ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करणार आहेत. तरुणाईला त्यांच्यातील सुप्त ऊर्जा जीवन घडविण्यासाठी कशी वापरावी याचे मौलिक सल्ले ते या कार्यक्रमातून देणार आहेत. निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळीच्या माध्यमातून हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. यावेळी अनिल नानीवडेकर, प्रतिभा शिंगारे, गेल कंपनीचे उपमहाव्यवस्थापक गिरीश गालिंदे, हिरण्य नेत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २५०१२०२१-कोल-सतीश देशमुख-जादूगर