कोल्हापूर : सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात एवढी कामे केली आहेत, की जनतेला दुसरा कुठला विचार करण्याची गरज नाही. काम करून दाखविण्याची जिद्द असणारा ‘परमनंट’ कार्यकर्ता मिळाला असून, ‘दक्षिण’साठी सतेज पाटील हाच सक्षम पर्याय आहे. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी केले. नागाव व नंदगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते. दोन्ही सभांना लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.घाटगे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातला संघर्ष कमी व्हावा आणि एकोपा निर्माण व्हावा यासाठी मी प्रयत्न केले. त्यावेळच्या उमेदवारांना तुम्ही आता ‘उत्तरे’ला म्हणजेच दिल्लीला निघालाय, तेव्हा आता ‘दक्षिणे’कडे बघायचं नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. सतेज पाटील यांनी ‘आघाडी धर्म’ पाळला, पण त्यांचे वेगळेच सुरू आहे. या असल्या गोष्टी करणे मला पटत नाही. सर्वांनी एकत्र बसून विचार करून घेतलेला निर्णय सर्वांनीच पाळणे आवश्यक असते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.’ ते म्हणाले, ‘शाहू कारखान्याने या परिसरात पाणीपुरवठा संस्था उभारणीसाठी मदत केली. सतेज पाटील यांनी या संस्थांना सव्वा कोटीपर्यंतचा निधी शासनाकडून मिळवून दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझ्याकडचा टेंपररी चार्ज तुमच्याकडे घ्या आणि विकासकामांकरिता माझ्याकडे कोण येणार नाही याची काळजी घ्या, असे सतेज पाटील यांना सांगितले होते. त्यांनी माझा हा ‘शब्द’ मानून या भागासाठी गेल्या ४० वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे पाच वर्षांत करून दाखविली. मी मतदारसंघात जेथे-जेथे जातो, तेथे लोक मला सतेज पाटील यांनी केलेल्या कामांबद्दल भरभरून सांगतात. पाटील यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मनापासून मदत केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा.’सतेज पाटील म्हणाले, ‘घाटगे यांनी पाठिंबा दिल्याने अर्धी लढाई मी जिंकली आहे. जनता माझ्यावरील प्रेमापोटी उरलेली अर्धी लढाई लढतील. जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी निश्च्ािंत आहे.’नागावच्या सभेला साताप्पा रानगे, एकनाथ पाटील, विजय नाईक, सरपंच आण्णासाहेब कोराणे, रंगराव तोरस्कर, तर नंदगावच्या सभेत जिल्हा परिषद सदस्या मनीषा वास्कर, किरणसिंह पाटील, सरपंच शाबाजी कुराडे, ‘शाहू’चे संचालक एम.आय. चौगले, महिपती पाटील, विजय गायकवाड यांची भाषणे झाली.तुम्ही कशाचे संस्थापकविक्रमसिंह घाटगे हे शाहू समूहाचे संस्थापक आहेत. मी गगनबावडा साखर कारखान्याचा संस्थापक आहे. आज काही मंडळी राजाराम कारखाना व ‘गोकुळ’मध्ये आयत्या बोक्यासारखे येऊन बसले आहेत. ते कुठल्या संस्थेचे संस्थापक आहेत, असा टोला सतेज पाटील यांनी आमदार महाडिक यांचे नाव न घेता लगावला.महाडिक यांचे दलबदलू राजकारणमहाडिक यांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना घाटगे म्हणाले, ‘वडील काँग्रेसचे आमदार, पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार आणि मुलाने भाजपची वाट धरली आहे. एकाच घरात आणखी किती पदे हवीत..? जिल्ह्यात दुसरे चांगले कार्यकर्ते आहेत की नाहीत, अशी विचारणा घाटगे यांनी केली. विक्रमसिंह घाटगे बोलताना लोकांतून एक कार्यकर्ता उठून उभा राहिला आणि म्हणाला, महाडिक हे सापाच्या प्रवृत्तीचे आहेत. त्यांना दूध जरी पाजले, तरी ते डंखच करणार. त्यावर घाटगे म्हणाले, ते साप असतील तर मी नागाळा पार्कातील अस्सल नाग आहे. या विधानावर सभेत एकच हशा पिकला. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, पण ते आपल्याला आता मदत झाली नसल्याचे सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा किस्सा घडला.
‘दक्षिण’साठी सतेज पाटीलच पर्याय
By admin | Updated: October 6, 2014 00:15 IST