शिरोळ : शिरोळ तालुक्यात २४ बिनविरोध तर ३३ ग्रामपंचायतीमधील ३९९ उमेदवार असे ४२५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून अनेक सदस्यांनी सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. बुधवारी (दि. २७) होणाऱ्या सरंपच आरक्षण सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीचे आरक्षण निघणार आहे. सन २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी ही आरक्षण सोडत होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवाय यामध्ये २६ महिलांना सरपंचाची संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती, सर्वसाधारण, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा आरक्षणातून सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे आपल्या गावचे आरक्षण नेमके कोणते राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
चौकट - सोडतीनंतर घोडेबाजाराला येणार उधाण
सरपंच आरक्षणासाठी दोनच दिवस उरले आहेत. अनेक इच्छुक सदस्यांची झोप उडाली आहे. सरपंच आरक्षण काय राहील, याची गणिते मांडली जात आहेत. सरपंच आरक्षणावरच सत्तेची गणिते ठरणार असून सोडतीनंतर घोडेबाजाराला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.