कोपार्डे - करवीर तालुक्यातील भामटे, खाटांगळे, उपवडे गावात ज्या प्रवर्गाचे आरक्षण आले आहे, त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. याबाबत हरकतीही आल्या; पण तहसीलदारांना व संबंधित यंत्रणेला योग्य मार्गदर्शन नसल्याने या गावचे सरपंचपद अधांतरी राहणार आहे. करवीर तालुक्यातील भामटे, खाटांगळे व उपवडे या गावाच्या बाबतीत अशी घटना घडली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमनुसार लोकसंख्येवर आधारित प्रभाग व सरपंच आरक्षणाची सोडत काढली जाते. काही ठिकाणी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जमाती ही आरक्षण त्या त्या जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर काढली जाते; पण काही गावात अशा प्रवर्गातील लोकसंख्या कमी असल्याने आरक्षण पडत नाही.
अशीच परिस्थिती करवीर तालुक्यातील सध्या झालेल्या निवडणूक व सरपंच आरक्षणाने समोर आली आहे. भामटे येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले, मात्र येथे हा उमेदवार नसल्याने येथे दुसरे आरक्षण द्यावे, ही मागणी करवीर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शिवाजी देसाई यांनी हरकत घेतली. आपल्याला असे अधिकार नसल्याचे तहसीलदार शीतल भामरे-मुळेनी सांगितले. अशीच परिस्थिती खाटांगळे व उपवडे येथील ग्रामपंचायतीमध्ये निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती महिला आरक्षण असले तरी उमेदवार नाही. याबाबत जाणकारांकडे विचारणा केली असता आता आरक्षण बदलता येणार नाही. ही जागा रिक्त ठेवून उपसरपंचाकडून ग्रामपंचायत कारभार सुरू ठेवता येईल, पण आरक्षित उमेदवार नाही म्हणून सरपंच पदच रिक्त ठेवणे हेही लोकशाही विरोधी असल्याचे मत व्यक्त केले.