सांगली : विमान हा तसा सर्वांचाच कुतूहलाचा विषय. या क्षेत्राविषयी जाणून घेण्याची आणि या क्षेत्रात जाण्याची इच्छा अनेकांना असते. पण योग्य दिशा न मिळाल्याने ही स्वप्ने अपुरी राहून जातात. मुलांचे हे कुतूहल शमविण्यासाठी ‘लोकमत’च्या ‘संस्काराचे मोती : जरा हटके’ या उपक्रमांतर्गत ‘उडान’ हा तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम शुक्रवारी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आला होता. पुण्याच्या प्रणव चित्ते यांनी ‘उडान’चे सादरीकरण करून बच्चेकंपनीला मंत्रमुग्ध केले. या माध्यमातून ‘थ्री इडीएट’फेम कॉडकॉप्टरचे सादरीकरण सांगली, मिरज शहर व ग्रामीण भागात विविध शाळांमधून करण्यात आले. हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भावले. विमान म्हणजे नक्की काय, त्याचा इतिहास, त्यामागील विज्ञान, त्याचा उपयोग, तसेच वैमानिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची माहितीही यातून देण्यात आली. ‘संस्काराचे मोती : जरा हटके २०१५’ ही धमाल स्पर्धा इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १ जुलै ते १० आॅक्टोबर या कालावधित आयोजित करण्यात आली असून, ही स्पर्धा ‘लोकमत’मधील ‘जरा हटके’ या सदरावर आधारित आहे. बुध्दीला चालना मिळण्याबरोबरच संस्कारक्षम ज्ञानाचा खजाना म्हणून या सदराकडे पाहिले जाते. स्पर्धेसाठी एकूण १०० कूपन प्रसिध्द होणार असून त्यापैकी ८५ कूपन प्रवेशिकेवर चिकटविणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत प्रत्येक शाळेसाठी प्रथम बक्षीस रिमोटवरील हेलिकॉप्टर, द्वितीय बक्षीस वॉल कार, तृतीय बक्षीस टिफीन बॉक्स आहे. दहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय लकी ड्रॉद्वारे लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाचे ‘संस्कार’
By admin | Updated: July 10, 2015 23:50 IST