सांगलीच्या गावठाणाची गटारगंगेत घुसमट-सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:25 AM2019-03-14T00:25:07+5:302019-03-14T00:26:12+5:30
शहरातील खणभाग, नळभाग, मारुती रोड, वखारभाग, महावीरनगर या गावठाण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. महापालिकेकडून तात्पुरती
सांगली : शहरातील खणभाग, नळभाग, मारुती रोड, वखारभाग, महावीरनगर या गावठाण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. महापालिकेकडून तात्पुरती उपाययोजना करून या सांडपाण्याला वाट करून दिली जात असली तरी, हीच परिस्थिती कायम राहिल्यास यंदा पावसाळ्यात गावठाण परिसरात गटारगंगा झाल्याचे चित्र दिसणार आहे.
मध्यंतरी स्टेशन चौकात ड्रेनेज तुंबल्याने आठ ते दहा दिवस सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यापूर्वी मारुती चौकातील भाजी मंडईत सांडपाणी शिरले होते. वखारभागातील अनेक परिसरात ड्रेनेजच्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी सातत्याने वर येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाते. पण काही दिवसांनंतर पुन्हा ड्रेनेज वाहिन्या, गटारी तुंबतात. खणभागात गटारीही तुंबून आहेत. सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणाच विस्कळीत झाली आहे. इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणाऱ्या महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डासांचा उपद्रव वाढला आहे.
गावठाण परिसरातील ड्रेनेज वाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. तत्कालीन नगरपालिकेच्या काळात ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली होती. तेव्हाची लोकसंख्या व आताची लोकसंख्या यात मोठा फरक आहे. गावठाणात ४० टक्के लोकसंख्या राहते. त्याचा भार या ड्रेनेज वाहिन्यांवर पडतो. त्यात प्लास्टिक व इतर वस्तूंमुळे ड्रेनेज तुंबण्याचे प्रकारही वाढले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी त्याची स्वच्छता केली जाते. पण स्वच्छतेचे नाटकच अधिक होते.
सध्याच्या ड्रेनेज वाहिन्या गाळाने भरलेल्या आहेत. स्टेशन चौकातून पोस्टासमोरून जाणाऱ्या ड्रेनेजमध्ये सात ते आठ फूट गाळ साचला आहे. स्टेशन चौकात नवीन पाईप टाकलेली आहे. पण जुनी व नवीन पाईपलाईन खाली वर झाल्याने त्यात गाळ साचला आहे. त्यामुळे सांडपाणी पुढे सरकत नाही. स्टेशन चौकातील फूटपाथवरील वाहिनीतही गाळ व माती आहे. अष्टविनायक कॉम्प्लेक्सजवळून जाणारी चेंबर कधीच उघडलेली नाहीत. तिथेही चार ते पाच फूट गाळ आहे. त्रिमूर्ती चित्रपटगृह ते मनाली हॉटेलकडे जाणाºया वाहिनीतही गाळ अडकला आहे. त्यामुळे संपूर्ण खणभाग, वखारभाग, राजवाडा परिसरातील सांडपाणी तुंबून राहते. मारुती चौक ते जेजी मारुती मंदिर या ड्रेनेज वाहिन्यातही गाळ साचला आहे. ही वाहिनी एका शाळेच्या क्रीडांगणाखालून जाते. तेथील गाळ काढण्याचे काम कठीण आहे. त्यामुळे मारुती चौकातही सांडपाणी रस्त्यावर येत असते. या साºया ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता व गाळ काढण्याची गरज आहे. सध्या महापालिकेकडून कामचलावू उपाय केले जात आहेत; पण येणाºया पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर गटारगंगा झाल्याचे चित्र दिसणार आहे.
आरोग्याचा प्रश्न : मडपंपाची गरज
खणभाग, स्टेशन चौक, वखारभाग, अष्टविनायक कॉम्प्लेक्स, सिटी पोस्ट या परिसरातून जाणाºया ड्रेनेजच्या वाहिन्या आठ ते दहा फूट खोल आहेत. तरीही महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी या वाहिन्यात उतरून गाळ, माती, प्लास्टिक पिशव्या काढत असतात. काही ठिकाणी चेंबर छोटे असल्याने तेथील ड्रेनेजमध्ये उतरताही येत नाही. त्यात झाडांची मुळेही वाहिन्यात आडकाठी आणत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांकडून या वाहिन्यांची स्वच्छता होऊ शकत नाही. त्यासाठी मडपंपाद्वारे या ड्रेनेज वाहिन्या स्वच्छ करण्याची गरज आहे.